विद्यापीठ तयार करणार वीस हजार रक्‍तदात्यांची रक्‍तगट डिरेक्‍टरी

nmu
nmu

जळगाव : कोरोना विषाणूजन्य महामारी परिस्थितीमध्ये जरी विविध शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या असल्या तरी आकस्मिक शस्त्रक्रियांसाठी रक्तदान अत्यावश्‍यक आहे. तसेच रक्त कमी प्रमाणात लागणार असले तरी प्लेटलेट्‌स मात्र नियमितपणे उपलब्ध करणे गरजेचे आहे. ह्या दृष्टीने विद्यापीठ रासेयो विभाग गाव, शहर, महाविद्यालय, परिसंस्था, तालुका, जिल्हा व विद्यापीठ पातळीवर सर्व रोसेयो स्वयंसेवक, रासेयो कार्यक्रम अधिकारी, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून किमान वीस हजार रक्तदात्यांची रक्तगट डिरेक्‍टरी तयार करणार आहे. 

विद्यापीठ रासेयो विभाग व कार्यक्रम अधिकारी व सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि परिसंस्थांचे संचालक यांच्या मदतीने कोरोना संक्रमणकाळात व नंतरच्या काळातही सुव्यवस्थेसाठी सतत सहभागी व कार्यरत राहणार आहेत. याबाबत जिथे विद्यार्थी स्थानिक प्रशासनाच्या साहाय्याने बाहेर पडतील तिथे सर्व प्रकारची सुरक्षितता कशी घ्यायची ह्याबाबत कार्यक्रम अधिकारी व प्रशासनामार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच एका ऍपअंतर्गत सर्व स्वयंसेवकांचा समावेश करून प्रशिक्षण देण्याचे नियोजनसुद्धा आखण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून रक्‍तगट डिरेक्‍टरी तयार करण्यात येणार आहे. यामुळे त्या- त्या परिसरातील विशेषतः शासकीय रक्तपेढ्यांत विशिष्ट रक्तगटाचे रक्त व प्लेटलेट्‌स सहज उपलब्ध होणे शक्‍य होईल. आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार शेंदूर्णी महाविद्यालयाच्या रासेयो एककाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश पाटील यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबीराचे आयोजन करून 122 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. 


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून मोठा पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवडाभरापासून जनजागृती व रक्तदान शिबीर आदी उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्यावतीने जळगाव, धुळे, नंदूरबार या तीनही जिल्ह्यात संलग्नित महाविद्यालयाच्या सहकार्याने जनजागृती उपक्रमांना सुरूवात झाली आहे. 

जादूच्या व्हिडीओ क्‍लिपने जनजागृती 
विद्यापीठाचा रासेयो विभाग व समाजकार्य विभाग यांनी कोरोना महामारी आपत्तीत विद्यापीठ रासेयो स्वयंसेवक कोणती भूमिका बजावतील याबाबतचा आराखडा तयार केला आला आहे. गेल्या आठवडाभरापासून विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व समाजकार्य विभाग यांनी कोरोना संदर्भात जनजागृतीबाबत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. रासेयो स्वयंसेवक आकाश धनगर आणि इतर स्वयंसेवक हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोरोनाबाबत तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे वार्डात जाऊन वाटप करीत असून त्याव्दारे कोरोना विषाणूपासून स्वतःची काळजी कशी घ्यायची हे कटुंबातील लहानमोठ्यांना समजावून सांगत आहेत. चेतन उपाध्याय (जादूगार ) हा स्वयंसेवक आपल्या जादूच्या प्रयोगाच्या त्याने तयार केलेल्या व्हिडीओ क्‍लिपच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत आहे. 

पंधरा हजार स्वयंसेवक कार्यरत 
कुलगुरूंच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आपल्या पंधरा हजार विद्यार्थी स्वयंसेवकांना (ते आता जिथे कोरोना लॉकडाऊनमुळे स्थानबद्ध आहेत तिथूनच) किमान प्रत्येकी दहा कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थी मोबाईल फोनच्या किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून दहा कुटुंबांपर्यंत पोहोचत आहे. त्या कुटुंबातील सदस्य कोरोना लॉकडाऊनमुळे कोणत्या समस्यांना सामोरे जात आहेत ह्याचे सर्वेक्षण केले जात असून त्यांचे समुपदेशन केले जाते. याशिवाय त्या कुटुंबास धान्य, औषधे, बॅंकिंग सेवा, दूध, भाजीपाला इत्यादी जीवनावश्‍यक गोष्टी आणून देण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांची मदत घेऊन ह्या सेवा प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com