विद्यापीठात विद्यार्थी शंका निरसन कक्ष; परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तउद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन सुरू करावी असे नमूद करण्यात आले आहे.

जळगाव :  कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन व शंकांचे निरसन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थी शंका निरसन कक्ष स्थापन करण्यात आला असून सोमवार दि.११ मे पासून या कक्षाच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून या अहवालात परीक्षा आयोजनासंदर्भातील शिफारशींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या अहवालातील शिफारस क्रमांक ८ नुसार कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तउद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन सुरू करावी असे नमूद करण्यात आले आहे. परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य मिळण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय उपलब्ध करून द्यावी असेही म्हटले आहे.
त्या अनुषंगाने कुलगुरू प्रा पी.पी.पाटील यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना उद्भवणार्या शंकांचे निरसन करण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थी शंका निरसन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी हे कक्षाचे समन्वयक म्हणून काम पाहणार असून सोमवार (ता.११) पासून या कक्षाचे कामकाज दररोज सकाळी ११ ते ५ या वेळेत सुरू राहणार आहे. संगणक शास्त्र प्रशाळेत सुरू होणाऱ्या या कक्षाचा हेल्पलाईन नं ०२५७-२२५८४११ असा असून ईमेल आय डी - covid19helpdesk@nmu.ac.in असा आहे. यावर विद्यार्थ्यांना आपल्या शंका विचारता येतील. कक्षात सदस्य म्हणून प्रा.किशोर पवार, प्रा.समीर नारखेडे, प्रा.अजय पाटील, प्रा.नवीन नंदी, प्रा.उज्वल पाटील हे काम पाहतील.अशी माहिती प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही पवार यांनी कळविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon university open student Doubt revocation section