ऑनलाइन परीक्षांसाठी विद्यापीठाची यंत्रणा सज्ज 

अमोल महाजन
मंगळवार, 14 एप्रिल 2020

एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहेत. मंगळवारी देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर आता या नियोजनाचे भवितव्य 3 मे नंतर ठरणार आहे. 
 

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रत्येक विभागाचे शिक्षकांतर्फे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देत त्यासाठी योग्य त्या उपाययोजनांच्या तयारीत आहे. त्या अनुषंगाने नियोजन सुरू करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहेत. मंगळवारी देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर आता या नियोजनाचे भवितव्य 3 मे नंतर ठरणार आहे. 
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर राज्यपालांनी नुकतीच राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून परीक्षा घेण्यासंबंधीही विचार विनिमय करण्यात आली असून यावर नेमलेल्या समितीच्या निर्णयावर राज्यपालांच्या आदेशाने परीक्षा घेण्याच्या कोणत्याही निर्णयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइनद्वारे महाविद्यालयीन परीक्षा घेण्याच्या विचार शासनातर्फे केला जात आहे. 

परीक्षा तर होणारच! 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्चपासूनच विद्यापीठाचा सर्व कारभारच बंद असल्याने सोशल मीडियावरही महाविद्यालयीन परीक्षा रद्द बाबतचे मेसेज व्हायरल होत होते. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून शासनाच्या निर्णयानुसार लॉकडाउन कालावधीत वाढ झाल्यास सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून यासाठी विद्यापीठ सर्व प्राध्यापकवर्गासह तयारीत असून याबाबत विद्यापीठातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. 

ऑनलाईनद्वारे अभ्यासक्रम पूर्ण 
लॉकडाउनची स्थिती निर्माण होण्याआधीच विद्यापीठाच्या विविध शाखा, विषयांचा 70% अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला होता. तसेच अंतर्गत चाचण्याही घेण्यात आल्या होत्या. तरीही काही राहिलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे घरीबसूनच अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात आला आहे. 

विद्यार्थ्यांना देणार पूर्वसूचना 
लॉकडाउन उठल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात एक महिना आधीच पूर्वसूचना द्यावी लागणार असून त्याआधारे विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षाही देता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती वेळोवेळी पाहणे गरजेचे आहे. 

शेवटच्या वर्षाला प्राधान्य 
परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन सुरू असून लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढल्यास पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करुन पहिल्या महिन्यातच परीक्षा घेण्यात याव्यात त्यात शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

ऑनलाइन परीक्षांसाठी तयारी सुरू 
विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा घेण्यासंबंधी नियोजन सुरू असून विद्यापीठातर्फे याबद्दल प्राचार्यांना पूर्वकल्पना देण्यात आली आहे. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी विद्यापीठात परीक्षांचे ऑनलाइन पॅटर्न राबविण्यात आले होते. ऑनलाइन परीक्षा घेण्याचे जाहीर झाल्यास विद्यापीठाची पंधरा दिवसात तयारी पूर्ण करुन परीक्षा घेण्याची सज्जता राहणार आहे. 

ऑनलाइन अध्यापनाची राज्यपालांची सूचना 
कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्‍यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा सामायिक पद्धतीने घेण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली आहे. वर्च्युअल क्‍लास रुम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाइन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरु ठेवावे, अशीही सूचना राज्यपालांकडून करण्यात आली आहे. 

स्वायत्त महाविद्यालयांनीही लागू 
स्वायत्त महाविद्यालयांना परीक्षा घेण्याचा मुभा असला तरीही विद्यापीठांतर्गत येणाऱ्या काही महाविद्यालये स्वायत्त झाले असले तरीही त्यांना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात राहूनच परीक्षांबाबत जो निर्णय येईल व विद्यापीठ ठरवेल त्याप्रमाणेच परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. 

विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही 
राज्यातील चार विद्यापीठातील कुलगुरूंची समिती यावर नेमलेली असून त्यांनी सुद्धा ऑनलाइन परीक्षा घेण्याचा पर्याय सुचवला आहे. यामुळे परीक्षा एका आठवड्यात होणे शक्‍य असून निकालही पंधरा दिवसात लागू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळही वाचणार असून पुढील सुट्यांचे समायोजनही करण्यात येणार असून ऑनलाइन परीक्षा घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्यास विद्यापीठ यासाठी सज्ज असून वेळ आली तर पंधरा दिवसात तयारी करता येणार आहे. 
- प्रा. पी. पी. माहुलीकर, प्र- कुलगुरु, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon university Ready online exam