"वाघूर'चे भूत पुन्हा मानगुटीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ फिर्यादीत पन्नासपेक्षा अधिक संशयितांचा नावांसह उल्लेख असताना दोषारोपात प्रदीप रायसोनींसह केवळ सहा जणांनाच संशयित करण्यात आले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नाव त्यातून वगळण्यात आले, हे विशेष..! 

जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यानंतर आता वाघूर, विमानतळ, अटलांटा, जिल्हा बॅंक या गुन्ह्यांचा तपास मार्गस्थ झाला आहे. त्यातील वाघूर पाणीपुरवठा योजनेतील कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी 2012 मध्ये दाखल गुन्ह्यात तपासाधिकाऱ्यांनी आज दोषारोपपत्र दाखल केले. तथापि, मूळ फिर्यादीत पन्नासपेक्षा अधिक संशयितांचा नावांसह उल्लेख असताना दोषारोपात प्रदीप रायसोनींसह केवळ सहा जणांनाच संशयित करण्यात आले आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे नाव त्यातून वगळण्यात आले, हे विशेष..! 

मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पदभार सोडण्याआधीच सतरा मजलीत झालेल्या गैरव्यवहारांवर बोट ठेवत घरकुल, वाघूर पाणीपुरवठा योजना, अटलांटा कंपनीमार्फत शहरात तयार करण्यात आलेले रस्ते, मोफत बससेवा, विमानतळ या पालिकेच्या सर्वच प्रकल्पांतून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे पत्र राज्य शासनाला दिले होते. गेडाम यांनी शासनाला दिलेल्या पत्रानुसार या सर्व प्रकल्पांचे विशेष लेखापरीक्षण झाले आणि 23 एप्रिल 2008 रोजी या लेखा परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाला होता. 

गुन्ह्याची पार्श्‍वभूमी 
लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे तत्कालीन नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी 28 जुलै 2012 ला शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून दाखल गुन्ह्यात गेल्या सहा वर्षांत चार वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तपास होता. मात्र अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी केलेल्या तपासाअंती आज मुख्य न्यायदंडाधिकारी सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सकाळी अकरापासून श्री. बच्छाव आणि गुन्ह्यातील सहा संशयित न्यायालयात हजर होते. दोषारोपपत्राचा अभ्यास केल्यावरच पुढील कामकाज होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. 

यांच्या विरुद्ध दोषारोप 
दोषारोपपत्रात तत्कालीन पालिका उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष तथा माजी महापौर प्रदीप ग्यानचंद रायसोनी, तत्कालीन नगराध्यक्षा सिंधू विजय कोल्हे, सदाशिव गणपत ढेकळे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी, मुख्याधिकारी पी. डी. काळे, वाघूर प्रकल्पाचे कंत्राटदार मोतीलाल कोटेचा यांच्यावर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. 

128 कोटींचा गैरव्यवहार? 
वाघूर अपहार प्रकरणात 128 कोटीपर्यंत अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद करून तत्कालीन 12 माजी नगराध्यक्ष, 2 महापौर, अधिकारी, मक्तेदार व 50च्या वर नगरसेवकांवर तक्रारदारांनी ठपका ठेवला होता. गुन्हा दाखल होऊन झालेल्या तपासाअंती मात्र ज्यांच्या गैरव्यवहारात प्रत्यक्ष सहभाग नाही, अशांना वगळण्यात आले आहे. परिणामी केवळ सहा संशयितांच्या विरुद्धच दोषारोप पाठवण्यात आले. विशेष म्हणजे यात कुणालाही अटक झालेली नसून, दोषारोप सादर करताना हजर राहण्याचे समजपत्र पोलिसांकडून देण्यात आल्याने सर्व सहा संशयित न्यायालयात हजर होते. या सर्वांना उद्या (ता. 6) पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 
 
गुन्ह्यात कागदपत्रांवर आधारित तपासात संशयितांची चौकशी सुरू होती. प्रत्यक्ष सहभाग असलेल्या सहा संशयितांवर जबाबदारी निश्‍चित झाली असून त्यांनी वेळोवेळी पोलिस तपासात सहकार्य केले आहे. त्यामुळे अटकेची आवश्‍यकता नव्हती. 
- प्रशांत बच्छाव तपासाधिकारी, अप्पर अधीक्षक 

Web Title: marathi news jalgaon vaghur water supply froad