वाळूमाफियांनी गिरणापात्रात पूल बांधलाच कसा? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

जळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा? त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. या पुलावरून अवैधरीत्या रात्रंदिवस सर्रास वाळू वाहतूक सुरू आहे. मात्र, तरीही जिल्हा महसूल प्रशासन, तसेच जळगाव, धरणगाव तालुका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. 

जळगाव ः आव्हाणी (ता. धरणगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वेगळा पूल तयार केलाच कसा? त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. या पुलावरून अवैधरीत्या रात्रंदिवस सर्रास वाळू वाहतूक सुरू आहे. मात्र, तरीही जिल्हा महसूल प्रशासन, तसेच जळगाव, धरणगाव तालुका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. 
काल आव्हाणी येथे गिरणा नदीपात्राजवळ वाळूच्या डंपरने (एमएच 19- झेड 7590) गुरे चारणाऱ्या पुंडलिक पाटील यांना धडक देत चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवून दिला. यात पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. 
दरम्यान, या प्रकरणी दोनगाव (ता. धरणगाव) येथून अवैधरीत्या वाळूचा उपसा सर्रास सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला. गिरणा नदीपात्रात वाळूमाफियांनी वाळू वाहतुकीसाठी स्वतः पूल तयार केला आहे. यामुळेच दोनगावला ठेका असताना गिरणा नदी परिसरातील खेडी, आव्हाणी, वडनगरी, कानळदा, फुफनगरी या गावांतील नदीपात्रातून वाळूचा अवैधपणे उपसा होत आहे. नदीपात्रात अनेक ठिकाणी वीस ते पंचवीस फुटांपर्यंत खोल खड्डे केले गेले आहेत. 
धानोरा येथे दोन वर्षांपूर्वी पात्रातील खोल खड्ड्यांमुळेच नदीला पूर आला असताना युवकाला जीव गमवावा लागला. यामुळे जिल्हा प्रशासनाने धानोऱ्याचा वाळू ठेका रद्द केला. आता गिरणा नदीपात्रात अनेक ठिकाणी खड्डे करून सर्रास अवैध वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध का कारवाई होत नाही? असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. 

दोन्ही तहसीलदार का पोहोचले नाहीत? 
जळगाव व धरणगावचे तहसीलदार वाळूमाफियाकडून हप्ते घेतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळेच घटना घडल्यानंतरही ते घटनास्थळी पोहोचले नाहीत. हद्दीचे कारण सांगून ते वाळूमाफियाला पाठीशी घालत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. 

पूल बांधल्याची चौकशी 
गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्यांनी पूल बांधल्याची चौकशी मी स्वतः करणार आहे. नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार ही चौकशी होईल. त्यात दोषी आढळलेल्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

वाळूच्या ठेक्‍याचे मोजमाप 
दोनगाव येथील वाळूठेक्‍याचे मोजमाप सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागातर्फे केले जाईल. जर ठरवून दिलेल्या ब्रासपेक्षा अधिक उपसा केला असेल, तर संबंधितावर कारवाई केली जाईल, अशी माहिती धरणगावचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली.

Web Title: marathi news jalgaon valu firna river