अवैध वाळूचे "नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर! 

अवैध वाळूचे "नेक्‍सस' सामान्यांच्या जिवावर! 

गेल्या आठवड्यात अवैध वाळू वाहतुकीने आणखी एक बळी गेला.. यावेळचा अपघात महामार्गावरील नव्हता, तो होता नदीपात्राजवळीलच एका छोट्या मार्गावरील.. बळी जाणारा दुचाकीस्वार नव्हता, तो होता गुरे चारणारा गरीब शेतकरी.. जीव घेणारे वाहन मात्र तेच वेगवान डंपर.. घटना घडल्यानंतर नेहमीप्रमाणे संतप्त नागरिकांनी डंपर जाळून निषेध नोंदविला.. पंचनामा, गुन्हा दाखल होणे आदी सोपस्कार पार पडले.. मात्र, पुढे काय? हा प्रश्‍न कायम आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे प्रकार होत असताना वाळू व्यावसायिक, महसूल आणि पोलिस विभागातील "स्ट्रॉंग नेक्‍सस' व त्यामागील राजकीय वरदहस्तामुळे हे "नेक्‍सस' कुणी मोडून काढेल, अशी अपेक्षा बाळगणे मूर्खपणाचे ठरेल. 
 
अवैध वाळू उपसा व वाहतूक आणि त्यातून होणाऱ्या अपघातातील बळी ही बाब जळगाव जिल्ह्यासाठी नवीन नाही. महसूल असो की पोलिस कोणत्याही प्रशासनाने कितीही ठरवले तरी या बेकायदा वाळू वाहतुकीवर नियंत्रण मिळविणे कठीण. ही समस्याच आजच निर्माण झालेली नाही, तर जळगाव जिल्ह्यातील वाळू व्यवसायातील गुन्हेगारीला अनेक वर्षांची "परंपरा' लाभलेली आहे. अर्थात, साधारण दीड-दोन दशकांपूर्वी वाळूचे ठेके घेण्याच्या स्पर्धेतून कायदा-सुव्यवस्थेस धोका पोहोचायचा. तेव्हा ही स्पर्धा वाळू व्यावसायिकांमध्येच व्हायची, सामान्य नागरिकांच्या जिवावर ती कधी उठली नाही. मात्र, अंतर्गत जीवघेण्या स्पर्धेने वाळू व्यावसायिकांना "वाळूमाफिया' म्हणून पदवी कधी मिळाली, हे कळलेच नाही. 
आता, मात्र या व्यावसायिकांमध्ये ठेके घेण्यावरून असलेली स्पर्धा, आणि त्यातून निर्माण होणारी स्थिती हा विषयच बाद झालाय. या व्यावसायिकांनी आपापल्या सोयीनुसार "चेन' करत ठेके आपसांतच वाटून घेतले आणि ही स्पर्धा संपुष्टात आली.. असे असले तरी आता या व्यावसायिकांमध्ये वेगळीच स्पर्धा सुरु झालीय आणि ती आहे, दिवसभरात जास्तीत जास्त वाळू उपसा व वाहतूक करण्याची. आणि हीच स्पर्धा सामान्यांच्या जिवावर उठलीय. हजारो ट्रॅक्‍टर व शेकडो डंपर एकट्या जळगाव परिसरातून दररोज हजारो फेऱ्या मारतात. अधिकाधिक फेऱ्या मारण्याच्या नादात ही वाहने रस्त्यांवरुन सुसाट धावतात.. महामार्ग तर मृत्यूचा सापळा बनलेला, त्यासह अन्य रस्ते.. अगदी गल्लीबोळांमधून ही वाहने साक्षात "यमदूत' बनूनच धावताना दिसतात. गेल्या सहा महिन्यांत वाळू डंपर, ट्रॅक्‍टरच्या अपघातात जळगाव परिसरात तब्बल दहा जणांचा बळी गेलांय.. आता सरत्या आठवड्यातच आव्हाणी येथील वृद्ध शेतकऱ्याचा डंपरच्या धडकेने जागीच अंत झाला व त्यातून ग्रामस्थांचा उद्रेक होऊन त्यांनी डंपर पेटविला. 
अशा घटनांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने संवेदनशील होत तातडीने कठोर कारवाई करण्याची अपेक्षा असताना या घटनेत हद्दीचा वाद, तहसीलदारांचा विलंब या गंभीर बाबी समोर आल्या. अवैध वाळू वाहतुकीत महसूल-पोलिस- परिवहन विभागाचे "नेक्‍सस' कार्यरत असल्याच्या दाव्याला अशा प्रकारांमुळे बळकटी मिळते. माध्यमांमधून रकाने भरुन येतात, तरी ही दोन्ही "डिपार्टमेंट' त्याचा इन्कार करीत नाही की, खुलासाही पाठवीत नाही. 
एरवी, जिल्ह्यातील विविध गंभीर, संवेदनशील यासह जिव्हाळ्याच्या विषयांत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी जातीने लक्ष घालताना दिसतात. वाळू वाहतुकीच्या संदर्भात त्यांनी स्वत: काहीवेळा नदीपात्रात उतरुन तपासणी केल्याची उदाहरणे आहेत. मग, तरीही हे प्रकार कसे थांबत नाही? हाच प्रश्‍न आहे. अर्थात, प्रत्येकवेळी त्यांनी स्वत: नदीपात्रात उतरण्याची गरज नाही. दोन-चार कठोर कारवायांमधून "योग्य संदेश' दिला जाऊ शकतो, तेवढेच करण्याची गरज आहे. त्यासाठी कारवाईच्या दिवशी राजकीय नेत्यांचे फोन तेवढे "रिसीव्ह' न करण्याची हिंमत मात्र दाखवावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com