वनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा 

वनजमीन फसवणूक प्रकरणी ठाकूरसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा 

जळगाव : भागपूर- कंडारी शिवारातील वनजमीन कोट्यवधींत कागदोपत्री विक्री केल्या प्रकरणी अखेर आज जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोन आणि शहर पोलिस ठाण्यात एक, असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून घेण्यात आले. "महसूल'च्या साक्षीने हा सर्व व्यवहार झाला असून, तत्कालीन तलाठ्यासह 11 संशयितांचा यात समावेश आहे. गेली दीड- दोन वर्षे पोलिस कर्मचाऱ्यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार संशयित मुकुंद बलविंदरसिंह ठाकूर हा या सर्व गुन्ह्यांत "मास्टरमाइंड' असल्याचे दाखल तक्रारीत म्हटले आहे. 
जळगाव तालुक्‍यातील वनजमीन "सातबारा'वर परस्पर विक्री करणाऱ्या टोळीकडून 500 कोटींत विकल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांना केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. अधिकाऱ्यांच्या कानउघाडणीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती. समितीने एक महिन्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर 30 दिवसांनी अहवाल सादर केला. त्यानुसार मूळ "सातबारा'वर वनजमीन वन विभागाच्या नावे असल्याचे अधिकाऱ्यांच्या अहवालात स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासनाने हात वर करत ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनीच पोलिस ठाण्यात तक्रारी देण्याचा निर्वाळा दिला होता. त्यानुसार एकेक तक्रारदार समोर येऊन आज तीन तक्रारदारांच्या फिर्याद नोंदवून या तीन गुन्ह्यांत 11 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल होऊन पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, निरीक्षक अनिरुद्ध अढाव, सहाय्यक निरीक्षक विजय देशमुख, प्रवीण जगताप, जीवन पाटील, श्रीकृष्ण सपकाळे, दिलीप चव्हाण, हितेंद्र अहिरकर यांनी तक्रारींची चौकशी करून गुन्हे दाखल करतानाच सहा संशयितांना ताब्यात घेत तत्काळ अटक केली. 

तीन गुन्हे 10 कोटींच्या घरात! 
शहर पोलिस ठाण्यात सुनील दत्तात्रय माळी (वय 54, रा. शनिपेठ) यांच्या तक्रारीत भूमिहीन नातेवाइकांच्या नावाचे बनावट उतारे तयार करून नंतर सुनील माळी यांचे खरेदीखत करून 52 लाख 42 हजार रुपये घेत, बळिरामपेठेतील सहउपनिबंधक कार्यालयात सहा संशयितांनी बनावट खरेदीखत लिहून सोपवले. एरंडोलच्या शिक्षिका नेहा कांतिलाल शर्मा (वय 28) यांच्या तक्रारीवरून मुकुंद ठाकूरसह 10 संशयितांनी तशाच पद्धतीने भूमिहीनचा बनाव करून तीन कोटी 14 लाख 77 हजार रुपये घेऊन जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बनावट खरेदीखतावर नोंदीची कागदपत्रे सोपवली. या दोघांप्रमाणेच विमा प्रतिनिधी अभिमन्यू अर्जुन पाटील (वय 56) यांना तशाच पद्धतीने स्वस्तात जमिनीचे आमिष दाखवत पाच कोटी 29 लाख 91 हजारांत 11 संशयितांनी गंडवले. तिन्ही गुन्ह्यांत तेच ते संशयित पुन्हा असून, एकूण नऊ कोटी सात लाख 10 हजारांत फसवल्याचे समोर आले आहे. 

अशी "मोड्‌स ऑपरेंडी' 
मुकुंद ठाकूर याने शासन भूमिहीन शेतकऱ्यांना अल्पदरात शेतजमिनी वाटप करीत असल्याचे सर्वत्र पसरविले. नंतर पैसे देऊन खरेदी करू शकतील, असेच सावज शोधून त्यांच्या गोरगरीब नातेवाइकांचे आधार कार्ड, मतदान कार्ड आणि छायाचित्रे मिळवून काही दिवसांनी चक्क त्यांच्या नावांचे सातबारा उतारे काढून आणले. गावतलाठ्याच्या सही-शिक्‍क्‍यानिशी उताऱ्यांवर नावे पाहिल्यानंतर चर्चा झाल्याने घेणाऱ्यांची रीघ लागली. नंतर सातबारा उताऱ्यावरील नोंदी फिरवून चक्क उपनिबंधक कार्यालयात नेऊन खरेदी देत कोट्यवधी रुपये उकळण्यात आले. 

तिन्ही गुन्ह्यांत 11 संशयित 
मुकुंद बलविंदरसिंग ठाकूर, सुरेंद्र बलविंदरसिंग ठाकूर (दोन्ही रा. बालाजीपेठ), कंडारीचा तलाठी रवींद्र पंढरीनाथ बहादुरे (रा. गुजराल पंप), ऍड. प्रदीप निवृत्तिनाथ कुळकर्णी (रा. दादावाडी, जळगाव), रूपेश भिकमचंद तिवारी (इंद्रप्रस्थनगर), सतीश प्रल्हाद सपकाळे (रा. भारत डेअरी, नवीपेठ), कैलास दशरथ बारी, राजेंद्र बुधोजी बारी, सुभाष दशरथ बारी, गणेश बारी, सुनील दशरथ बारी (सर्व रा. नवीपेठ), रूपेश भिकमचंद्र तिवारी, अशा बारा संशयितांची नावे समोर येऊन तीन गुन्ह्यांत स्टॅम्पवेंडर बारी बंधू आणि मुख्य संशयित मुकुंद ठाकूर कायम आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com