"वाघूर' धरणात दोन वर्षे पुरेल इतका साठा 

"वाघूर' धरणात दोन वर्षे पुरेल इतका साठा 

जळगाव : यंदा राज्यासह जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे वाघूर धरणाच्या जलपातळीत मोठी वाढ झाली असून, पुढील दोन वर्षे पुरेल इतका साठा धरणात आहे. यामुळे शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी महापौरांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. 
गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्यामुळे यंदा उन्हाळ्यात जळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. यामुळे गेल्या पाच -सहा महिन्यांपासून शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांआड करण्याचे जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले होते. मात्र, यंदा राज्यासह जिल्हाभरात गेल्यावर्षीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने आतापर्यंत धरणाच्या पातळीमध्ये वाढ होऊन 79 टक्के साठा उपलब्ध आहे. तसेच परतीच्या पावसात जिल्ह्यात अजून पर्जन्यमान झाल्यास वाघूर धरण पूर्णपणे भरण्याची शक्‍यता असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी. एस. खडके यांनी दिली. 

जळगावकरांना दिलासा 
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. सन 2017 मध्ये 79 टक्के पाणीसाठा होता. मात्र, आता तीन वर्षांच्या कालावधीनंतर वाघूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, सद्य:स्थितीला 79 टक्के साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जळगावकरांसह जामनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून, पाणीप्रश्‍न मिटला आहे. 

अशी आहे जलपातळी 
वाघूर धरणाची उच्चतम जलपातळी 234.10 मीटर असून, आजच्या स्थितीत धरणातील पाण्याची पातळी ही 232.450 मीटर इतकी आहे. तसेच धरणातून 220.200 मीटर पातळीवरून महापालिकेकडून पाण्याची उचल केली जाते. सध्या धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा किमान दोन वर्षे पुरेल इतका आहे. 

दोन दिवसांआड पाणीपुरवठा करा 
उन्हाळ्यात धरणाच्या पातळीत घट झाल्याने शहरात दोन ऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे; परंतु, दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र महापौर सीमा भोळे यांनी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com