नागरिकांचे पाण्यासाठी हाल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणारी वाघूरची जलवाहिनी लिकेज झाल्यानंतर ती दुरुस्त करण्यास विलंब झाला. यामुळे सलग दोन दिवस पाणीपुरवठा करता आला नाही. यातच महापालिकेनेही टॅंकरद्वारे पर्यायी व्यवस्था केली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 

जळगाव : शहराला पाणीपुरवठा करणारी वाघूरची जलवाहिनी लिकेज झाल्यानंतर ती दुरुस्त करण्यास विलंब झाला. यामुळे सलग दोन दिवस पाणीपुरवठा करता आला नाही. यातच महापालिकेनेही टॅंकरद्वारे पर्यायी व्यवस्था केली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 
धरणात साठा असताना वाघूरची वाहिनी सक्षम नसल्याने जळगावकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वाघूर धरणातून शहरास पुरवठा करणारी वाहिनी नेहमीच फुटत असते. दोन दिवसांपूर्वी ही वाहिनी गिरणा पाण्याच्या टाकीजवळ फुटली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणामुळे दुरुस्ती होऊ शकली नाही. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प आहे. 

नागरिकांची भटकंती 
शहरात ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, त्याच भागात सलग दोन दिवस पुरवठाच झाला नाही. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांनी जार विकत घेतले. परंतु वापरण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शिवाजीनगर, खडके चाळ, तांबापुरा आदी भागांत नागरिक दुचाकीला कॅन लावून मिळेल तिथून पाणी आणताना दिसून आले. 

पर्यायी व्यवस्थेचा अभाव 
पाणीपुरवठा न होणाऱ्या भागात महापालिकेने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज होती. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी कानावर हात ठेवले. याशिवाय महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नाही. यामुळे नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. 

पर्यायी व्यवस्था करावी 
कमल बागूल : जलवाहिनी लिकेज झाल्यास दुसऱ्या दिवशी ज्या भागात पाणीपुरवठा असेल त्या भागात महापालिकेने टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था करावी. 

जनतेचे हाल कशासाठी? 
सोनाली मोरे : महापालिका पाणीपट्टी वेळेवर घेते, मग वाहिनी लिकेज असेल तर पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था का करीत नाही? नागरिकांचे हाल कशासाठी केले जातात? याकडे पाहायला हवे. 
 

Web Title: marathi news jalgaon water muncipal corporation