पराभवाची जाण अन्‌ जबाबदारीचे भान 

पराभवाची जाण अन्‌ जबाबदारीचे भान 

लोकसभेच्या 2014 मधील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजपला उत्तर महाराष्ट्रात आणि विशेषतः खानदेशात निर्भेळ यश मिळाले. या यशामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असले, तरी दारुण पराभवामुळे विरोधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत सन्नाटा पसरला आहे. "यशाने हुरळून जायचे नसते, तसे पराभवाने खचताही कामा नये..' असे म्हटले जाते. स्वाभाविकत: यशाच्या रथावर स्वार होताना मतदारांचा विश्‍वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी भाजपवर असताना विरोधी पक्षांसमोरही पराभवाची जाण ठेवत आगामी निवडणुकीत "कमबॅक' करण्याचे आव्हान आहे. 

खानदेशात 2014 च्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती झाली. भाजपच्या बाजूने राहण्याची परंपरा जळगाव जिल्ह्याने यावेळीही जोपासली. सोबतच धुळे व नंदुरबार जिल्ह्यानेही भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीस वर्षांत सातत्याने जळगाव व रावेर या जागा भाजप जिंकत आला आहे. अगदी विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेच्या मागे जिल्ह्याने मतांचे पाठबळ उभे केल्याची उदाहरणे आहेत. अर्थातच, भाजपमधील ज्या मजबूत संघटनशक्तीचा दावा केला जातो त्या बळावर भाजपला हे यश मिळविणे शक्‍य होते. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्त्यांचे समर्पित कार्य हेदेखील या यशामागचे प्रमुख कारण मानावे लागेल. 
मुळात दोन-तीन दशकांपूर्वी त्यावेळच्या प्रतिकूल स्थितीत भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांनी आपले आयुष्य वेचत पक्ष वाढविला, तळागाळापर्यंत पोहोचविला. त्यांनी केलेल्या भक्कम पायाभरणीला सध्याच्या नेत्यांनी आपल्या नियोजनातून तटबंदी उभारून दिली आणि गेल्या दोन पंचवार्षिक लोकसभा निवडणुकांतून मोदी नावाच्या करिष्म्याने त्यावर विजयी पताका फडकली. यश मिळाले म्हणून त्या उत्साहात त्याचे श्रेय घेणारे अनेक हात पुढे येत आहेत, येतीलही. 
याउलट विरोधी पक्षांची अवस्था आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना अनुक्रमे रावेर, जळगावमधून अपयशाला सामोरे जावे लागल्यामुळे आघाडीच्या गोटात पराभवाच्या कारणांची मीमांसा आणि त्यावर चिंतन सुरू आहे. पराभवाच्या जबाबदारीतून कदाचित काही पदाधिकारी राजीनामा देण्यासाठीही पुढे येतील, पण त्याने काय साध्य होणार? हादेखील प्रश्‍नच आहे. म्हणूनच ही निवडणूक काही पहिली आणि अंतिम निवडणूक नव्हती, हे पराभूत आघाडीतील पक्षांनी लक्षात घ्यायला हवे. पराभवाची कारणमीमांसा करताना पहिले कारण समोर येते ते संघटनशक्तीच्या अभावाचे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांना सामोरे जाताना कॉंग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना त्यांच्या संपूर्ण संघटनाची पुनर्बांधणी करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. शिवाय, स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेचाही पक्षातील धुरिणांना विचार करावा लागणार आहे. 
भाजपसमोर यशाचे ताटच वाढून तयार आहे. त्यामुळे सध्यातरी भाजपवासीयांना दुसरे काही दिसणार नाही. तरीही मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना पहिल्याच बैठकीत कानमंत्र देताना जबाबदारीची जाणीव करून दिली. ती स्वाभाविकत: पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरही आहे. यशाने हुरळून न जाता ज्यांनी निवडून दिले त्यांच्याप्रती या यशामुळे अधिक जबाबदारी वाढली, त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविण्याचे दायित्व वाढले, हे प्रत्येकच यशोधारीला समजून घ्यावे लागेल. विरोधी पक्षातील नेते पराभवाची कारणे शोधत असताना यशसिद्धी प्राप्त करणाऱ्यांना जबाबदारीचे भानही ठेवावे लागेल, हे वेगळे सांगायला नको. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com