वृद्ध आईने 'व्हॉटस्‌ऍपवर' घेतले मुलाचे अंत्यदर्शन 

Whatsapp
Whatsapp

जळगाव : पुण्याकडून बिहारकडे जाणाऱ्या रेल्वेगाडीतून पडून एका परप्रांतीय तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह उचलून जिल्हा रुग्णालयात दाखल केला. छिन्नविछिन्न मृतदेहाच्या पॅंटच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीवरून पोलिस कर्मचाऱ्याने मृताचे नाव, गाव शोधून काढत त्याच्या वयोवृद्ध आईला दु:खद वार्ता कळविली. आईने "व्हॉटस्‌ऍप'वरच मुलाचे अंत्यदर्शन घेतले. अठरा विश्‍व दारिद्य्र.. खायला नाही..तिथं मृतदेह अंत्यसंस्काराचे आठ, दहा हजार कोण देणार..प्रवास खर्चही नाही, अंगात ताकद नाही अखेर पोलिसांच्या खर्चाने मुलावर अंत्यसंस्कार करण्याचा जबाब लिहून दिल्यावर चौथ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

पुण्याकडून येणाऱ्या सुपरफास्ट एक्‍स्प्रेसमधून मंगळवारी (ता. 18) पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. खांबा क्रमांक 423/3 जवळ रेल्वेरुळावर पहाटे चारच्या सुमारास मृतदेह पडल्याची माहिती उपस्टेशन प्रबंधकांनी तालुका पोलिसांना कळविली. तालुका पोलिस ठाण्यातील नाईक विजय पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. धावत्या रेल्वेतून खाली पडल्यावर छिन्नविछिन्न शरीरासह अंगावरील कपड्यांच्याही चिंध्या झाल्या होत्या. अशा मृतदेहाची ओळख पटविण्याची शक्‍यताच नसताना पंचनामा करताना मृत तरुणाच्या कपड्यांमध्ये आढळून आलेल्या चिटोरीवर "मुरगावनी', जिल्हा डुमका असे लिखित आढळले. त्याच शब्दाचा आधार घेत विजय पाटील यांनी इंटरनेटवरून शोध सुरू केला.

गाव सापडल्यावर तेथील पोलिस नियंत्रणकक्षाला फोन करून पोलिस ठाण्याचा नंबर मिळवला. पोलिस ठाण्यात तिथल्या निरीक्षकांशी बोलणी करून मृताच्या घराचा पत्ता शोधून काढत त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. अखेर मृताची ओळख पटविण्यात यश येऊन त्याचे नाव किस्कू शिवा (वय 35, रा. मरगावनी जि. डूमका, झारखंड) असे निष्पन्न झाले. ओळख पटल्यावर मृताच्या आईला मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, 36 तासांचा रेल्वे प्रवास आणि खर्चाची ऐपत नसल्याचे किस्कूच्या आईने कळविले. त्याची आई मिरु हसदा (वय 62) या स्वत: मोलमजुरी करून चरितार्थ चालवितात. हलाखीची परिस्थिती असल्याने मुलगा कामासाठी परराज्यात (पुणे) गेला होता. मात्र, तेथून परततानाच त्याचा मृत्यू ओढवला. 

"व्हॉटस्‌ऍप'वर ओळख अन्‌ अंत्यदर्शन 
वयाची साठी केव्हाच पार केलेल्या वृद्धेला झारखंड पोलिसांनी शोधल्यावर तिने मुलगा पुण्याला गेल्याचे सांगितले. पोलिस अधिकारी तिवारी यांनी दु:खद बातमी दिली.. तद्‌नंतर जळगाव येथून विजय पाटील यांनी "व्हॉटस्‌ऍप'वर कपडे व मृतदेह दाखविल्यावर..हाच माझा मुलगा, अशी हमी देत धायमोकलून रडून घेतल्यावर..झारखंडपासून जळगावात येण्यासाठी पैसे नाहीत..थकलेले आजारी शरीर जाणे अशक्‍य असल्याने.. अखेर या मावलीने तेथेच सरकारी खर्चाने अंत्यसंस्काराची विनवणी केली, तसा जबाबही झारखंड पोलिसांनी नोंदवून घेतला.. पोलिसांनी आज चौथ्या दिवशी अंत्यसंस्कार केले. तत्पूर्वी पोलिस नाईक विजय पाटील यांनी व्हॉटस्‌ऍपवरुन या मावलीला अंत्यदर्शनही घडविले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com