रात्री गारवा, दिवसा चटके; हुडहुडीनंतर.. थंडी पुन्हा गायब! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020


"ग्लोबल वॉर्मिंग'मुळे वातावरणात अनेक बदल घडून येत आहेत. आपल्याकडे नोव्हेंबरपर्यंत यंदा पावसाळा लांबला. आता हिवाळ्यातही ऋतुचक्र बदलल्याचे दिसत आहे. कमाल व किमान तापमानातील हे अचानक होत असलेले चढ- उतार चिंताजनक आहे. या वातावरणाशी जुळवून घेताना आपल्याला त्रास होणे स्वाभाविक म्हणावे लागेल. 
- प्रा. डॉ. एस. टी. इंगळे, विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ 

जळगाव : दोन दिवसांपूर्वीच अगदी दिवसा.. भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी थंडी अचानक दोन दिवसांतच पुन्हा गायब झाली आहे. रात्री गारवा कायम असला तरी मंगळवार व आज बुधवारीही दुपारी चटके जाणवत होते. या दोन-तीन दिवसांची तुलना केली तर कमाल आणि किमान तापमानात तब्बल 9-10 अंशांचा फरक पडला आहे. 
गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यानंतर पावसाळ्यानेही अनिश्‍चित प्रकारचे रूप दाखविले. जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील लोकांची दिवाळी अक्षरश: पाण्यात गेली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू होता आणि तोदेखील सातत्यपूर्ण व पावसाळ्यात पडतो तसा जोरदार. पावसाळा जसा बेभरवशाचा झाला. त्याच स्थितीतून हिवाळ्याची वाटचाल होत आहे. त्याचा प्रत्यय गेल्या महिनाभरापासून येत आहे. 

क्‍लिक करा - विदेश पक्षांनी बहरले हतनुरचे पात्र 

थंडी गायब 
गेल्या आठवड्यात बऱ्यापैकी थंडी पडली होती. दिवसाही गार वारे वाहत असल्याने उबदार कपडे भर दुपारीही घालून नागरिक फिरत होते. कमाल व किमान तापमान कमालीचे घटले होते. त्यामुळे शेकोट्याही पेटत होत्या. सोमवारपर्यंत थंडीचे हे रूप पाहिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा थंडी गायब झाल्याचे दिसून येत आहे. 

नऊ अंशांची वाढ 
सोमवारपासूनच दिवसाचा गारवा गायब झाला आहे. किमान तापमानात दोन दिवस फरक नव्हता. मात्र, मंगळवारी 10 अंशांवर असलेले किमान तापमान बुधवारी मात्र तब्बल 19 अंशांवर पोचले होते. तर 19 तारखेला 21 अंश सेल्सियस असलेले कमाल तापमान मंगळवारी म्हणजे 21 तारखेला तब्बल 29 अंश इतके नोंदले गेले. अर्थात, 20 तारखेलाही ते 29 अंशांवर होते. रात्रीच्या तापमानाचा पारा मात्र गेल्या आठवड्यापासून 9-10 अंशांच्या घरात आहे. 

असे होते तापमान 
तारीख------- कमाल------किमान 
17 जानेवारी----21-----11 
18 जानेवारी----22-----10 
19 जानेवारी----21------9 
20 जानेवारी-----29-----10 
21 जानेवारी-----29----10 
22 जानेवारी------32-----19 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon winter claimet change temprture 9 digree high