Loksabha 2019 : महिलांना उमेदवारीत मिळाली अल्प संधी! 

Loksabha 2019 : महिलांना उमेदवारीत मिळाली अल्प संधी! 

भडगाव : राज्यात एकूण मतदारांपैकी ४७ टक्के महिला मतदार आहेत. महिला मतदारांचा एवढा मोठा आकडा असताना राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मात्र महिलांना पाहिजे तेवढे प्राधान्य दिले नसल्याचे चित्र आहे. भाजपने सहा, काँग्रेसने तीन, तर राष्ट्रवादी व शिवसेनेने प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारणाऱ्या प्रमुख राजकीय पक्षांचे ‘बोलाचा भात अन् बोलाचीच कढी’ असल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. 
निवडणुकीचे नगारे वाजायला लागले, की विविध पक्ष महिला सक्षमीकरणाचे ढोल बडवायला लागतात. कोणी महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे सांगतात, तर निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचेही आश्वासने काही पक्ष देतात. प्रत्यक्षात मात्र ज्या ठिकाणी महिलांना न्याय देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना नाममात्र प्रतिनिधित्व देण्यात प्रमुख राजकीय पक्ष धन्यता मानत पुरुषशाहीलाच प्राधान्य देण्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. 

भाजपकडून सर्वाधिक संधी 
भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात ‘रावेर’मधून रक्षा खडसे, नंदुरबारला डॉ. हीना गावित, दिंडोरीतून भारती पवार, बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना, तर बारामतीतून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्याखालोखाल काँग्रेसने तीन महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात वर्धा मतदारसंघातून चारुलता टोकस, उत्तर मुंबईमधून ऊर्मिला मातोंडकर यांना, तर उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांना उमेदवार दिली आहे. नेहमी महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीतून सुप्रिया सुळे या एकच महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शिवसेनेनेही यवतमाळ- वाशिममधून भावना गवळी या एकमेव महिला उमेदवाराला संधी दिली आहे. याशिवाय अमरावतीतून कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीतर्फे युवा स्वाभिमान पक्षाला जागा सोडण्यात आली आहे. तेथे नवनीतकौर राणा या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर बच्चू कडू यांनीही यवतमाळ- वाशिम मतदारसंघातून वैशाली येडे यांना संधी दिली आहे. बहुजन वंचित आघाडीने दोन- तीन ठिकाणी महिलांना संधी दिली आहे. जळगावमध्ये शिंपी समाजाच्या अंजली बाविस्कर यांना उभे केले आहे. राज्यात भाजपने इतर पक्षांच्या तुलनेने अधिक महिला उमेदवार दिल्या आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे. 

राज्यात सहा महिला खासदार 
राज्यात मावळत्या लोकसभेत एकूण सहा महिलांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. यात भाजपच्या चार, तर राष्ट्रवादी व शिवसेनेच्या प्रत्येकी एक महिला खासदारांचा समावेश होता. त्या सर्व पुन्हा त्या- त्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. 
 
‘कथनी आणि करणी’त मोठा फरक! 
राज्यात सुमारे आठ कोटी ७३ लाख ३० हजार ४८४ मतदार आहेत. त्यापैकी चार कोटी ५७ लाख २५७९ पुरुष मतदार आहेत, तर चार कोटी १६ लाख २५८१९ महिला मतदार आहेत. उर्वरित इतर मतदार आहेत. महिलांचा एकूण मतदानामध्ये ४७ टक्के वाटा आहे. मात्र, राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना तेवढ्या प्रमाणात त्यांना वाटा दिलेला दिसून येत नाही. उमेदवार देताना जातीय समीकरणे पाहिली जातात. महिला मतदारांची संख्या का पाहिली जात नाही, असा प्रश्न महिलांकडून यानिमित्ताने विचारला जात आहेच तर यावरून प्रमुख राजकीय पक्षांच्या ‘करणी अन् कथनी’त मोठा फरक असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com