जळगावात "स्वाइन फ्लू'ने विवाहितेचा मृत्यू 

जळगावात "स्वाइन फ्लू'ने विवाहितेचा मृत्यू 

जळगाव ः शहरातील शिवाजीनगर परिसरातील अमन पार्कमधील सदतीसवर्षीय विवाहितेचा आज सकाळी "स्वाइन फ्लू'मुळे मृत्यू झाला. वाढत्या तापमानामुळे शहरात "स्वाइन फ्लू'ची साथ हळूहळू पसरत असून सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनी "टॅमी फ्लू' गोळ्या व वेळेत उपचार घेणे हीच उपाययोजना असून, रुग्ण व त्याच्या नातेवाइकांनी काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. 
गेल्या काही महिन्यांपूर्वी शहरात "स्वाइन फ्लू' आणि हिवताप, डेंग्यूची साथ पसरली होती. वेळीच उपाययोजना केल्याने साथ आटोक्‍यात आली. दरम्यान, उन्हाचा कडाका वाढतच "स्वाइन फ्लू'ने पुन्हा डोके वर काढले आहे. शिवाजीनगरातील अमन पार्क मशिदीजवळ राहणाऱ्या सुफियाबी शेख अखलाक यांच्यावर काही दिवसांपासून जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी साडेसहाला त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचे नातेवाइक फरीद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार सुफियाबी यांचा मृत्यू "स्वाइन फ्लू'मुळे झाला. 

वाढत्या तापमानामुळे साथ 
"स्वाइन फ्लू' (एच 1, एन 1) हा जिवाणू व संसर्ग आजार थंडी किंवा वाढलेल्या तापमानात याचा संसर्ग वाढतो. सध्या जळगावात उष्णतेची लाट असून, दुपारी कडक सूर्यप्रकाश आहे, तर सकाळी व सायंकाळी हवामान आता पूर्णपणे गरम आहे. अशा प्रकारच्या हवामानात "स्वाइन फ्लू'सह अनेक नवीन रोग उद्‌भवतात. हा आजार संसर्गजन्य असल्याने रुग्णांनी काळजी न घेतल्यास रुग्णाच्या संपर्कात, तसेच दुसऱ्या व्यक्तींनाही या आजाराची लागण होऊ शकते. 

पंधरा दिवसांपूर्वी कार्यशाळा 
"स्वाइन फ्लू'चे वाढते रुग्ण, वाढलेली साथ, इतर आजारांबाबत पंधरा दिवसांपूर्वी महापालिका रुग्णालय विभागाने शहरातील खासगी डॉक्‍टरांची कार्यशाळा घेतली. यात संशयित रुग्णांची माहिती महापालिका रुग्णालय विभागाला देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे, अशी माहिती रुग्णालय विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली. 

"टॅमी फ्लू'च्या गोळ्या मेडिकलवर उपलब्ध 
"स्वाइन फ्लू'ची सुरवात सर्दी, खोकला, ताप असून "टॅमी फ्लू'च्या गोळ्यांनी प्राथमिक उपचार झाल्यास वाढणारा "स्वाइन फ्लू' वेळेत उपचार झाल्यास कमी होतो. याबाबत शासनाच्या आदेशानुसार खासगी मेडिकलवर "टॅमी फ्लू'च्या गोळ्या आता रुग्णांसाठी उपलब्ध आहे. 
 
"स्वाइन फ्लू'ची लक्षणे 
- सर्दी, खोकला, जास्त ताप 
- डोकेदुखी, घशात खवखव 
- नाकातून पाणी वाहने 
- थकवा, उलट्या होणे 

या आहेत उपाययोजना 
- लक्षणे दिसल्यास रिपोर्ट येण्यापूर्वी उपचार सुरू करावेत 
- "टॅमी फ्लू'च्या गोळ्या घ्यावा 
- रुग्णाने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे 
- शिंकताना, खोकलताना तोंडाला रुमाल लावावा 
- मास्कचा वापर करावा. 

वाढत्या तापमानामुळे "स्वाइन फ्लू'ची साथ वाढते. सर्दी, ताप आलेल्या रुग्णांनी प्रथम "टॅमी फ्लू' गोळ्या घेतल्यास होणारा आजार टळू शकतो. तसेच डॉक्‍टरांना रुग्णास या आजाराचे लक्षण आढळल्यास रिपोर्ट येण्याची वाट न बघता आधी उपचार सुरू करावा. जेणे करून वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतील. 
- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com