आयुष्य म्हणजे प्रतिकूल स्थितीत लढण्याचं रणांगण  : ऍड. निकम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

जळगाव : तरुणाई म्हणजे एकप्रकारची अणुशक्ती आहे. या शक्तीचा सुयोग्य वापर केला पाहिजे. आयुष्य हे खेळण्या-बागडण्याचं क्रीडांगण नाही, तर ते प्रतिकूल स्थितीत लढण्याचं रणांगण आहे. यासाठी तरुणांनी सदैव सज्ज असायला हवं, असे आवाहन विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले. 

जळगाव : तरुणाई म्हणजे एकप्रकारची अणुशक्ती आहे. या शक्तीचा सुयोग्य वापर केला पाहिजे. आयुष्य हे खेळण्या-बागडण्याचं क्रीडांगण नाही, तर ते प्रतिकूल स्थितीत लढण्याचं रणांगण आहे. यासाठी तरुणांनी सदैव सज्ज असायला हवं, असे आवाहन विशेष सरकारी वकील, पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी केले. 
"सकाळ- यिन'तर्फे आयोजित "समर यूथ समिट'मध्ये आज तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात ऍड. निकम यांनी विद्यार्थ्यांशी त्यांच्या खास शैलीत संवाद साधला. तरुणाईला साद घालताना ते म्हणाले, की अलीकडच्या काळातील तरुण फार निराश झालेला दिसतो किंवा तो कोणत्याही अपयशानं लगेच खचतो. हे नैराश्‍य न्यूनगंड तयार करते. यातून तरुण वाईट मार्गाकडे वळतात. तरुणाईत मोठी शक्ती आहे. या शक्तीचा राष्ट्र विकासासाठी, देशसेवेसाठी वापर झाला पाहिजे. इतर प्रगत राष्ट्रांमधील लोक कमालीचे देशभक्त असतात, आपल्या राष्ट्राचा ते मान-सन्मान राखतात. आपल्याकडे मात्र तसे होताना दिसत नाही, याबद्दल ऍड. निकम यांनी खंत व्यक्त केली. 

देशसेवेचा विचार करा 
तरुणाईतील हा उंबरठा ओलांडताना पुढं आपलं करिअर आपल्यासमोर आहे. प्रत्येक जण नोकरी, व्यवसाय, उद्योगाच्या मागे लागेल. हे करत असताना देशसेवाही महत्त्वाची आहे. "सकाळ माध्यम समूहा'सारख्या संस्था तरुणाईला योग्य दिशा देण्यासाठी अशा प्रकारच्या समिट घेतात, त्यामुळे हा उपक्रम केवळ स्तुत्यच नव्हे; तर अनुकरणीय व सेवाभाव जपणारा आहे, या शब्दांत ऍड. निकम यांनी "सकाळ'च्या उपक्रमांचे कौतुक केले. या संवादादरम्यान उपस्थित तरुणांनी ऍड. निकम यांच्या सूचनेनुसार प्रश्‍नही विचारले. त्यावर त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. या सत्राचे स्वप्नील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रारंभी "सकाळ'च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा व "यिन' महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांनी ऍड. निकम यांचे स्वागत केले. तत्पूर्वी ऍड. निकम यांच्या आयुष्यावरील प्रेरणादायी चित्रफीत दाखविण्यात आली. 
 
...तर मी कायद्याचा "डॉन' 
दहशतवादी, कुख्यात गुंडांविरुद्ध खटले लढताना धमक्‍या येत असतील, त्याची भीती वाटत नाही का? या प्रश्‍नावर ऍड. निकम म्हणाले, की भीती ही प्रत्येकालाच वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, आपल्या कामातील उद्देश प्रामाणिक असेल तर त्यातून भीती दूर करण्याचे बळ मिळते. कितीही मोठा गुंड असला तरी त्याला त्याच्या गुन्ह्याबद्दल पश्‍चात्ताप होईल, यासाठीही माझे प्रयत्न असतात. मात्र, अशा धमक्‍यांना भीक घालायची नसते. कारण हे आरोपी जर डॉन असतील तर मी कायद्याचा "डॉन' आहे, असे ते म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालयाचे खटले अभ्यासा 
कायद्याच्या विद्यार्थ्यांना संदेश देताना ते म्हणाले, की अभ्यासक्रमात आपण "मूट कोर्ट' अनुभवतो. मात्र, त्याचवेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध खटल्यांचा अभ्यास केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाची तत्त्वे अभ्यासायला हवीत. केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नसते. प्रभावी संवादशैलीही अंगी असावी लागते. ती सरावातून येते. त्यासाठी इंग्रजीतून संभाषणही चांगले असले पाहिजे. 

Web Title: marathi news jalgaon yin summit adv nikam