सामाजिक कार्याचीच जनतेत खऱ्या अर्थाने ओळख : महेश पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव : राजकारणात यायचे असेल "पैसा आणि बाहुबल' आवश्‍यक आहे, असे म्हटले जाते. त्या भीतीने युवक राजकारणाकडे येत नाहीत. मात्र आजच्या स्थितीत काहीअंशी ते खरे असले तरी सामाजिक कार्यच तुमची ओळख असते आणि जनता त्यालाच अधिक महत्त्व देते. याची आपल्याला जाणीव झाली असून, आपण पराभूत झालो असलो तरी जनतेच्या मनात आपण विजयी आहोत. त्यामुळे पराभवनाने खचून न जाता सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुन्हा जनतेच्या दरबारात जाणार आहोत, असे मत महेश रमेश पाटील यांनी व्यक्त केले आहे. प्रभाग सहा (ड) मधून ते अपक्ष उमेदवार होते. अवघे तेरा मतांनी ते पराभूत झालेले एकमेव उमेदवार आहेत. 

महेश रमेश पाटील यांचे शिक्षण एम.कॉम., एम.बी.ए. झालेले आहे. जळगावातील प्रसिद्ध असलेल्या अमर रगडाचे संचालक रमेश पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी प्रथमच महापालिका निवडणूक लढविली आहे. त्यांचे वय अवघे 27 वर्षे असून, जळगावातील ते सर्वांत तरुण उमेदवार होते. जळगावातील जानकीनगर झोपडपट्टी परिसरात त्यांचा रहिवास असल्याने सर्वसामान्य कुटुंबात असलेल्या समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने त्यांचे वडील रमेश पाटील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य करीत असतात. वडिलांच्या कार्याचा हाच वसा घेऊन महेश हे सुद्धा विविध उपक्रम राबवून परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक कार्य करीत आहेत. 
सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या या युवकाने प्रथमच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पर्दापण करण्याचा निश्‍चय केला. घराण्यात तसा कोणताही राजकीय वारसा नसल्याने निवडणुकीत उमेदवारी घेण्यापासून अडचणी आल्या. मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. चार गटाचा एक प्रभाग आणि त्यात अपक्ष निवडणूक लढवायची त्यात शिवसेना, भाजपच्या उमेदवारांशी टक्कर द्यायची म्हणजे मोठे धाडसच. परंतु महेश पाटील त्याला डगमगले नाहीत. त्यांनी धाडसाने अपक्ष उमेदवारी केली. वडील रमेश पाटील तसेच प्रभागातील युवकांनीही त्यांना बळ दिले. समोर बलाढ्य उमेदवार असतानाही पाटील यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर जनतेशी संवाद सुरू ठेवला. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त करीत तब्बल 3154 मते दिली. ते अवघ्या 13 मतांनी पराभूत झाले. 
पराभव झाल्यानंतरही ते खचले नाहीत. तब्बल 3154 मतदाराचे भरघोस मतदान आपल्या पाठीशी आहे. असा सकारात्मक विचार करून ते पुन्हा कामाला लागले आहेत. ते म्हणतात, आमच्या घराण्यात कोणीही निवडणूक लढविली नाही, मीच प्रथम निवडणूक लढविली त्यामुळे आमचा हा राजकारणाचा पहिलाच अनुभव होता. त्यामुळे आपल्याला बरेच काही शिकायला मिळाले. पैसा आणि जात हा फॅक्‍टर निवडणुकीत असतो, असे म्हणतात परंतु आपल्याला निवडणुकीतील अनुभवावरून ते आपल्याला काही पटत नाही. सामाजिक कार्य हीच तुमची खऱ्या अर्थाने ओळख असते. 

अपयशातूनच यश 
सुशिक्षित युवकांनी राजकारणात यायलाच पाहिजे, असे आपण आवर्जून सांगतो. कारण प्रचारातही आपण सुशिक्षित व नवयुवकांना मतदान करा, असे आवाहन केले होते आणि जननेतेही त्याला भरभरून साथ दिली. त्यामुळे युवकांनी हिंमत केलीच पाहिजे. एकदा अपयश आले, परंतु पुढे यश येईलच. हे सूत्र युवकांनी लक्षात ठेवले पाहिजे. आपणही हेच सूत्र लक्षात ठेवून सामाजिक कार्याच्या माध्यमातून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहोत. 
 
Web Title: marathi news jalgaon young palitical mahesh patil