Vidhan sabha 2019 : युती झाल्यास सेनेच्या तीन मतदारसंघात भाजपची बंडखोरी निश्‍चित! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे युती झाल्यास शिवसेनेला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्‍यता असल्याची आता शिवसैनिकांतच चर्चा सुरू झाली आहे. 

जळगाव : राज्यात शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युती होण्याचे संकेत असताना काही ठिकाणी आता बंडखोरी होण्याचीही तयारी सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार असलेल्या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी निश्‍चित असल्याचे दिसत आहे. तीनही मतदारसंघात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे युती झाल्यास शिवसेनेला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्‍यता असल्याची आता शिवसैनिकांतच चर्चा सुरू झाली आहे. 
जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष मजबूत आहे. जिल्हा परिषद, महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. दोन्ही खासदार भाजपचे आहेत. तर विधान परिषदेसह तब्बल आठ आमदारही भाजपचेच आहे. याशिवाय, बहुतांश पालिकाही भाजपच्याच ताब्यात आहे. या बळावर सद्या तरी इतर पक्षापेक्षा भाजपचा क्रमांक एक आहे. याच बळावर भाजप शिवसेनेसह सर्वच पक्षांना आव्हान देत आहे. अगदी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीतही शिवसेना विरुद्ध भाजप असाच सामना झाला. त्यात भाजपने यश मिळविले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व अकरा मतदार संघात भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्या ठिकाणी त्यांचे उमेदवारही तयार आहेत. परंतु युती झाल्यास जिल्ह्यातील पाचोरा, एरंडोल, जळगाव ग्रामीण, आणि चोपडा हे मतदारसंघ शिवसेनेला सोडावे लागणार आहेत. यापैकी एरंडोल वगळता इतर तीन मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. 
युती झाल्यास शिवसेनेच्या एरंडोल, जळगाव ग्रामीण आणि पाचोरा या तीन मतदारसंघात भाजपतर्फे बंडखोरी होण्याची शक्‍यता असून, तीनही मतदारसंघात भाजपचे इच्छुक अपक्ष उभे राहण्याची शक्‍यता अधिक आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी पाळधी येथे भाजपतर्फे मेळावाही घेतला. यावेळी शिवसेनेचे उपनेतेही सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी तालुक्‍यातील भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते. लक्ष्मण पाटील आता माघार घेण्याची शक्‍यता कमी असून, ते अपक्षही लढण्याच्या तयारीत आहेत किंवा ते "वंचित'चा मार्गही चोखाळण्याची शक्‍यता आहे. पाचोरा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपचे अमोल शिंदे यांनी रणशिंग फुकंले आहे. अमोल शिंदे यांच्यासाठी भाजपचे या मतदारसंघात शक्तिकेंद्र व बुथकेंद्र प्रमुखांच्या बैठकाही घेण्यात आल्या. जागा वाटपात पक्षाने या जागेची मागणीही केली आहे. मात्र, ही जागा शिवसेनेला जाणार हे निश्‍चित आहे, अशा स्थितीत अमोल शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवू शकतात. एरंडोल मतदार संघात शिवसेनेतर्फे चिमणराव पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे. मात्र, भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान नगराध्यक्ष करण पवार यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यांनी स्थानिक स्तरावर मेळावे घेऊन प्रचार सुरू केला आहे. तेही अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

बंडखोरांमुळे तिरंगी लढत? 
विशेष म्हणजे, शिवसेनेच्या मतदार बंडखोरी करून उभे राहणारे तीनही उमेदवार केवळ मते खाणार नाहीत. तर त्यांचा फायदा होण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार, तिसरे बंडखोर अशी तिरंगी लढत होईल. यात दोघांच्या मते विभागाणीत तिसऱ्या बंडखोराचा फायदा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, जिंकल्यावर हे बंडखोर भाजपकडेच असणार आहेत. त्यामुळे त्याचा फायदाही भाजपलाच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे युती झाल्यास जिल्ह्यात शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon yuti 3 matdar sangh bjp