युतीसाठी भाजपचा प्रतिसादच नाही : सुरेशदादा जैन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

जळगाव : शहर विकासाच्या दृष्टीने आम्ही भाजपकडे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजनही त्यास अनुकूल होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात महाजनांकडून या प्रस्तावास अखेरपर्यंत प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी गरज पडली, तर आपण प्रचारात प्रत्यक्ष उतरू असेही त्यांनी स्पष्ट केले. 

जळगाव : शहर विकासाच्या दृष्टीने आम्ही भाजपकडे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मुख्यमंत्र्यांसह गिरीश महाजनही त्यास अनुकूल होते. मात्र, नंतरच्या टप्प्यात महाजनांकडून या प्रस्तावास अखेरपर्यंत प्रतिसाद मिळाला नाही, अशी खंत शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली. या निवडणुकीसाठी गरज पडली, तर आपण प्रचारात प्रत्यक्ष उतरू असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची यादी श्री. जैन यांच्या निवासस्थानी पोचली. यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी आमदार आर. ओ. पाटील, रमेश जैन, सुनील महाजन, विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते. 

श्री. जैन म्हणाले, की राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. आम्ही मित्रपक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत. जळगावातही विकास व्हावा, या सकारात्मक हेतूने आम्ही युतीचा प्रस्ताव पुढे केला होता. मुख्यमंत्री, गिरीश महाजन यांच्याशी त्याबाबत चर्चाही झाली होती. नंतर आम्ही महाजनांकडून त्यासंदर्भातील चर्चेसाठी प्रतिसादाची प्रतीक्षा करत होतो. अखेरपर्यंत त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी आम्ही सर्व 75 जागांवर उमेदवार दिले. 

गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण प्रत्यक्ष घरोघरी जाऊन प्रचार केला नव्हता. विधानसभा निवडणुकीतही आपण अशा पद्धतीने प्रचार केला नाही. पक्षनेत्यांच्या सभा झाल्या, तेवढाच काय तो प्रचार. मला ती गरज भासली नाही. माझे कामच जनतेसाठी प्रचाराचा भाग होता. आताही थेट घरोघरी जाऊन प्रचार करणार नाही. पण गरज पडली, तर प्रत्यक्ष प्रचारात उतरू. याशिवाय, शिवसेना नेत्यांच्या सभा होतील, असेही जैन यांनी सांगितले. 

नागरी सुविधांना प्राधान्य 
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आमचा अजेंडा ठरलेला असतो. रस्ते, पाणी, गटारी, पथदिवे, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत गरजा पुरविण्यावर आमचा भर यावेळीही राहील. जनतेसाठी ही कामे महत्त्वाची असतात. या शिवाय समांतर रस्ते, अमृत योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम लवकर मार्गी लावणे, हे देखील आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत, असे रमेश जैन म्हणाले.

Web Title: marathi news jalgaon yuti bjp sureshdada jain