Vidhan sabha : शिवसेनेच्या गडात भाजपचे आव्हान! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना व भाजप यांची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप समेट झालेला नाही. दुसरीकडे स्थानिक स्तरावर मात्र आता दोन्ही पक्षांतील धुसफूस उफाळून वर येऊ लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच गडात आता भाजपने मेळावा घेऊन थेट शिवसेनेचे उमेदवार व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे युती होवो अथव न होवो या वादामुळे मने मात्र दुंभगली आहेत. युती झाल्यास मात्र ते सांधण्याचे पहिले कठीण काम युतीच्या नेत्यांना करावे लागेल.

विधानसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना व भाजप यांची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत अद्याप समेट झालेला नाही. दुसरीकडे स्थानिक स्तरावर मात्र आता दोन्ही पक्षांतील धुसफूस उफाळून वर येऊ लागली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. याच गडात आता भाजपने मेळावा घेऊन थेट शिवसेनेचे उमेदवार व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे युती होवो अथव न होवो या वादामुळे मने मात्र दुंभगली आहेत. युती झाल्यास मात्र ते सांधण्याचे पहिले कठीण काम युतीच्या नेत्यांना करावे लागेल. त्यानंतरच विरोधकांशी लढा द्यावा लागणार आहे. 

देशात व राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. परंतु आता विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती होईल की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, स्थानिक स्तरावर प्रत्येक मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीची तयारी केल्याचे दिसते. भाजपचे आमदार असलेल्या ठिकाणी शिवसेनेने तयारी सुरू केली आहे, तर शिवसेनेचे आमदार असलेल्या जागेवर भाजपची वेगळी तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. युती न झाल्यास दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवारही याच तयारीच्या माध्यमातून सज्ज ठेवले आहेत. अंतर्गत ही तयारी सुरू असताना कोठेही खुले वाद झालेले नाहीत. मात्र, त्याची सुरवात जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघात झाली आहे. 
जळगाव ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ. पूर्वी हा एरंडोल मतदारसंघ होता. त्यावेळी दोन्ही वेळा गुलाबराव पाटील निवडून आले. त्यानंतर जळगाव ग्रामीण मतदारसंघ झाला. त्यानंतर एकवेळ त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु पुन्हा जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे. शिवसेनेत वरिष्ठ असल्याने पक्षनेतृत्वाने त्यांना सहकार राज्यमंत्रिपदही दिले. गुलाबराव पाटील यांनी यावेळी मतदारसंघाची बांधणीही केली आहे. 
ेयुती झाल्यास गुलाबराव पाटील शिवसेनेचे उमेदवार असतील, हे निश्‍चित. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतर्फे अद्याप उमेदवार निश्‍चित झालेला नाही. विरोधकांशी लढा देण्यास गुलाबराव पाटील सज्ज असतानाच मित्रपक्ष भाजपने अचानकपणे त्यांच्या बालेकिल्यात आव्हान उभे केले आहे. 
भाजपने आज अचानक याच मतदारसंघात असलेल्या पाळधीत मेळावा घेतला. पक्षाचे नेते लकी टेलर ऊर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील, प्रभाकर पवार, चंद्रशेखर अत्तरदे, माजी जिल्हा परिषद सदस्य पी. सी. (आबा) पाटील यावेळी उपस्थित होते. मेळाव्यात त्यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातून लकी टेलर किंवा चंद्रशेखर अत्तरदे उमेदवार असतील, असे जाहीरही केले. पक्ष ज्याला उमेदवार देईल, त्याचा प्रचार करण्याची घोषणाही केली. लकी टेलर यांनी आपण प्रचाराला लागलो असून, जनतेचा पाठींबाही मिळत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे मेळव्याच्या आदल्या दिवशी मध्यरात्री मेळाव्याच्या ठिकाणी खुर्च्या, सामानाची मोडतोड करण्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जबाबदार ठरवून शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांच्यावर टीकाही केली. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद खुला झाला आहे. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी त्याला उत्तरही दिले आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील युतीतील उफाळलेला वाद केवळ एका मतदारसंघापर्यंत मर्यादित धरून चालणार नाही. त्यामुळे भाजपच्या गडातही शिवसेना हल्ला करणार, हे निश्‍चित. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर युती होण्याआधी खालच्या स्तरावर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातील वाद हलका घेऊन चालणार नाही, एवढे मात्र निश्‍चित! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon yuti gramin