युती तुटल्याच्या घोषणेचा पुढाकार पुन्हा जळगावलाच? 

युती तुटल्याच्या घोषणेचा पुढाकार पुन्हा जळगावलाच? 

जळगाव ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होणार की नाही? याबाबत अजूनही प्रश्‍नचिन्ह कायम आहे. दोन्ही पक्षांकडील नेत्यांनी आम्ही स्वतंत्रपणे लढण्यास सज्ज आहोत, अशी घोषणाही केली आहे. भाजपचे नेते व जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आम्ही 288 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे नुकतेच वक्तव्य केले. त्यामुळे सन 2014 नंतर राज्यात पुन्हा युती तुटण्याचे संकेत असून, यावेळीही "त्या' घोषणेचा पुढाकार जळगाव जिल्ह्यातील नेत्यालाच मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 
राज्यात शिवसेना-भाजपची तब्बल पंचवीस वर्षे अभेद्य युती होती. सन 1999 मध्ये या युतीचे सरकारही स्थापन झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे; तर उपमुख्यमंत्रिपद भाजपकडे होते. पुढे विधानसभा निवडणुकीत युतीचा पराभव झाला आणि राज्यातील सत्ता गेली. मात्र, त्यानंतरही युती कायम होती. दोन्हीकडील नेत्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार विरोध केला. तब्बल पंधरा वर्षे कॉंग्रेस आघाडीच्या विरोधात युतीने संघर्ष केला. 

अन्‌ युती तुटली 
भाजप-शिवसेनेची तब्बल 25 वर्षे अभेद्य असलेल्या युतीत सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून जोरदार वाद झाला. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही पक्षांत जागा वाटपाबाबत एकमत होऊ शकले नाही अन्‌ अखेर दोन्ही पक्षांनी विधानसभा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. 

भाजपतर्फे खडसेंकडून अधिकृत घोषणा 
दोन्ही पक्षांत जागा वाटपात एकमत न झाल्यामुळे अखेर युती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी भाजपतर्फे अधिकृत घोषणा करण्याची जबाबदारी एकनाथराव खडसे यांच्यावर होती. खडसे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन युती संपुष्टात आली असून भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली होती. 

आताही जिल्ह्याकडेच पुढाकार? 
सन 2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढल्या. निकालानंतर मात्र दोन्ही पक्षांनी पुन्हा युती केली. लोकसभाही युतीच्या माध्यमातून लढवत मोठ्या प्रमाणात यश मिळविले. "आमचं ठरलंय' अशी घोषणा करीत विधानसभेतही युती होण्याचा ठाम विश्‍वास दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे युती होण्याची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना खात्री होती. मात्र मध्यंतरी दोन्ही पक्षांत कॉंग्रेस व राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात नेत्यांचे इनकमिंग झाले. ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत होता त्या ठिकाणी विरोधी पक्षांतील नेत्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत लढणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक झाली आहे. त्यामुळे जागा वाटपावरून वाद सुरू झाले आहेत. भाजपने समसमान जागांची मागणी केली आहे. मात्र भाजपने त्याबाबत नकार दर्शविला आहे. भाजपचे नेते व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी थेट स्वतंत्र लढण्याची घोषणा करीत आम्ही 288 जागांवर लढण्यास तयार असल्याचे सांगितले, की त्यामुळे युती संपुष्टात येत आहे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या अधिक निकटचे आहेत. शिवाय भाजपचे "संकटमोचक' त्यांना म्हटले जाते. लोकसभेच्या पालघर मतदारसंघातील पोटनिवडणूक, धुळे, जळगाव, नाशिक महापालिका निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भरभक्‍कम यश मिळाले आहे. या यशामागे त्यांच्या रणनीतीचे श्रेय असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे महाजन यांनी स्वतंत्र 288 जागा लढविण्याच्या घोषणेला महत्त्व आले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही युती संपुष्टात येण्याचे संकेत दिले जात आहेत. गेल्या वेळी भाजपचे जळगाव जिल्ह्यातील नेते एकनाथराव खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती. यावेळी ही जबाबदारी जळगाव जिल्ह्यातीलच भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर असणार काय? याकडे आता लक्ष लागले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com