संकुलाच्या तळघरात दाखविले "गुदाम' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

जळगाव : शहरातील अनेक खासगी संकुलाच्या तळघरात दुकाने सुरू आहेत. मात्र अनेकांनी त्या ठिकाणी "गुदाम'च्या नावाखाली परवानगी घेतल्या असल्याचे कारणे दिले आहेत. फसवेगिरीचा हा फंडा आता उघड होत असून या प्रकरणी संकुलात जाऊन अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. 

जळगाव : शहरातील अनेक खासगी संकुलाच्या तळघरात दुकाने सुरू आहेत. मात्र अनेकांनी त्या ठिकाणी "गुदाम'च्या नावाखाली परवानगी घेतल्या असल्याचे कारणे दिले आहेत. फसवेगिरीचा हा फंडा आता उघड होत असून या प्रकरणी संकुलात जाऊन अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. 

शहरातील खासगी व्यापारी संकुल उभे राहिले, मात्र अनेक ठिकाणी पार्किंगच नसल्याने वाहने रस्त्यावरच लावण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. शहरात अतिक्रमण हटाव अंतर्गत रस्त्यावरील ओटे काढण्यात आले. मात्र संकुलात असलेल्या अनधिकृत दुकानावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी आयुक्तांनी कारवाई करण्याचे आश्‍वासन देवून या प्रकरणी संकुलाच्या मालकांना नोटीस बजावली आहे. 

दररोज 50 संकुलाची सुनावणी 
महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या आदेशानुसार नगररचना विभागातर्फे शहरातील 411 व्यापारी संकुलांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांची सुनावणी आता सुरू आहे. नगररचना विभागात दररोज ही सुनावणी होत आहे. नगररचना सहाय्यक संचालक श्री. धामणे सुनावणी घेत आहे. दररोज 50 संकुलाची सुनावणी होत आहे. 

"गुदाम'च्या नावाखाली परवानगी 
नगररचना विभागात सुरू असलेल्या या सुनावणीत बहुतांश संकुल धारकांनी आमच्याकडे तळघरात गोडाऊन असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीचा नकाशाच सादर केला आहे. त्यामुळे आता नगररचना विभागातर्फे नकाशे शोधण्याचे काम करीत आहे. तळघरात नियमानुसार "गुदाम'लाच परवानगी आहे. मात्र त्यासाठी पार्किंग क्षेत्रही दाखवावेच लागते, मग ते कुठे दाखविण्यात आले याबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

प्रत्यक्ष जागेवरच पाहणी 
शहरातील बहुतांश संकुल चालकांनी "गुदाम'चीच परवानगी घेतल्याचे दाखविले आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या संकुलाची आता अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
15 जानेवारीपर्यंत अंतिम आदेश 
नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की सुनावणी लवकरच पूर्ण करून 15 जानेवारीपर्यंत संकुलातील तळघरातील अतिक्रमणाबाबतचा अंतिम अहवाल देण्यात येईल. त्यानंतर संकुलात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येईल. 
 
सुनावणी घेण्यात आलेल्या संकुलात बहुतांश जणांनी तळघरात "गुदाम'ची परवानगी घेतल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काही संकुलात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून अंतिम अहवाल देण्यात येईल. 
-अनंत धामणे, नगररचना सहाय्यक संचालक, महापालिका जळगाव 

Web Title: marathi news jalgaon yvapari sankul parking godavun