शिक्षण विस्तार अधिकाऱ्यासह 18 कर्मचाऱ्यांना नोटीस 

live photo
live photo

जळगाव ः असोदा व भादली येथे अंगणवाडी, शाळा आणि आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत गुरुवारी (ता. 4) सीईओ डॉ. बी. एन. पाटील यांनी अचानक भेट देत तेथील सत्य परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यासह संबंधित 18 कर्मचाऱ्यांना आज नोटीस बजाविण्यात आल्या. याबाबत तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

शहरापासून काही अंतरावर असलेल्या असोदा व भादली गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्राबाबत तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्याकडे आल्या होत्या. यात प्रामुख्याने कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची तक्रार होती. यावरून सीईओ डॉ. पाटील यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी उपस्थित नसलेले कर्मचारी तसेच कामात दिरंगाई करणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसह केंद्रप्रमुख, आरोग्य अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि आरोग्यसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा 18 कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली. 

असोदा शाळेत शिक्षक गैरहजर 
असोदा येथील प्राथमिक शाळेत सीईओ डॉ. पाटील यांनी गुरुवारी सकाळी नऊ वाजताच अचानक भेट दिली. यावेळी उपशिक्षिका चंपा ठाकूर या विनापरवानगी अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. यावरून शिक्षिकेस नोटीस बजावण्यात आली. तत्पूर्वी सीईओंनी गावातील अंगणवाडीला भेट दिली. ती बंद असल्याचे निदर्शनास आले. ही बाब समजल्यानंतर अंगवाडीसेविका हजर झाल्या. मात्र दोन मदतनीस गैरहजर होते. त्यामुळे अंगवाडीसेविका मंगला चौधरी, मदतनीस वंदना माळी व ज्योती पाटील या तिघांना नोटीस दिल्या. तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. 

अकरा जणांवर शिस्तभंग 
भादली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीईओंनी सकाळी साडेनऊला भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर गैरहजर असल्याचे आढळून आले. आरोग्य केंद्रातील अकरा कर्मचारी उपस्थित नसल्याबाबत सीईओंनी नाराजी व्यक्त करत संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी, डॉ. ठाकूर यांच्यासह एनएम एस. जे. अत्तरदे, आरोग्य सहाय्यक व्ही. डी. बोरसे, औषध निर्माण अधिकारी जी. बी. निकम, आरोग्य सेवक डी. आर. ठाकूर, कनिष्ठ सहाय्यक एस. आर. हिवरे, परिचर एस. बी. सोनवणे, एस. पी. उपाटाके, एस. पी. लाडवंजारी यांचा समावेश आहे. 

अधिकाऱ्यांनाही नोटीस 
असोदा व भादली भेटीनंतर दांडीबहाद्दर कर्मचारी आढळून आल्याने संबंधितांच्या वरिष्ठांना देखील सीईओंनी नोटीस बजावली आहे. त्यात शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा सानप, केंद्रप्रमुख भगवान वाघ, असोदा शाळेच्या मुख्याध्यापिका आर. आर. तडवी यांचा समावेश आहे. शाळेत विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती, पोषण आहाराच्या नोंदवहीवर स्वाक्षऱ्या नसणे, विना तारखेच्या उत्तरपत्रिका दप्तरी दाखल करून ठेवण्याचे प्रयोजन काय?, पोषण आहार शिजविण्याचे अंदाजे काम आदी मुद्दे उपस्थित करत कामाकडे दुर्लक्ष केले आहे; असे नोटिशीत म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com