जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यातील बैठक भोवणार 

जि. प. अध्यक्षांच्या बंगल्यातील बैठक भोवणार 

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाने घेतलेली बैठक पक्षाला चांगलीच भोवणार असे दिसत आहे. या बैठकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार झाल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाईचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाने जिल्हा परिषद अध्यक्षांना नोटीस बजावली असून, त्याबाबत आठ दिवसांत खुलासा मागविला आहे. 

प्रशासनाच्या या कारवाईच्या निमित्ताने मनपा निवडणूक आगामी काळात चांगलीच गाजणार आहे. या मुद्यावरून विरोधकही राजकारण तापवणार असल्याचे मानले जात आहे. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त वातावरण तापू लागले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करू लागले असून, त्यामुळे निवडणूक रंगात आली आहे. यादरम्यान बुधवारी (ता. 18) महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या स्वातंत्र्यचौकातील शासकीय निवासस्थानी घेण्यात आली. 

आचारसंहितेचा भंग 
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शासकीय निवासस्थाने किंवा कार्यालये निवडणुकीसाठी वापरता येत नाहीत. असे असताना भाजपने ही बैठक घेतली. यासंदर्भात राष्ट्रवादीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत आज जिल्हा प्रशासनाने उज्ज्वला पाटील यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आठ दिवसांत वस्तुनिष्ठ खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय बंगल्यावरील ही बैठक भाजपला भोवण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 
 
आचारसंहिता भंगाबाबत चौकशी करून तसा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांना देण्यात आले आहेत. 
- राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी 
 
राज्य व केंद्रातील सत्तेत धुंद असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी बैठक घेतली. ही बाब आम्ही तक्रारीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. 
- संजय चव्हाण, कार्यालय सचिव, राष्ट्रवादी कॉंग्रेस
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com