दुधाचे खरेदी दर विक्रेत्यांनी घटविले !

दुधाचे खरेदी दर विक्रेत्यांनी घटविले !

जळगाव ः जिल्ह्यात दुधाच्या वितरणासंबंधी येणाऱ्या अडचणी, दुग्धजन्य पदार्थांची कमी मागणी व मजुरीसंबंधीच्या समस्या लक्षात घेता खासगी डेअरी चालक, विक्रेत्यांनी शेतकऱ्यांकडील दूध खरेदीचे दर मागील दोन दिवसात कमी केले आहेत. 
गायीचे खरेदी दर तब्बल आठ ते नऊ रुपये प्रतिलिटरने कमी केले आहेत. तर म्हशीच्या दुधाचे खरेदीदरही सात ते आठ रुपये लिटरमागे कमी झाले आहेत. 


खासगी डेअरीचालक, गावांमधून दूध खरेदी करून शहरात विक्री करणारे किरकोळ विक्रेते, डेअरीचालक गायीच्या दुधाची 29 ते 31 रुपये प्रतिलिटर या दरात शेतकऱ्यांकडून खरेदी करीत होते. तर म्हशीच्या दुधाची खरेदी 41 ते 45 रुपये प्रतिलिटर या दरात खरेदी केली जात होती. म्हशीच्या दुधाची शहरात किंवा विविध भागात ग्राहकांना 55 ते 60 रुपये प्रतिलिटर या दरात विक्री केली जात होती. तर गायीच्या दुधाची विक्री 42 ते 45 रुपये प्रतिलिटर या दरात केली जात होती. 


सध्या विक्री दर खासगी डेअरीचालक, किरकोळ विक्रेत्यांनी कमी केलेले नाहीत. परंतु शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाचे दर कमी केले आहेत. त्यात म्हशीच्या दुधाची खरेदी 38 ते 35 रुपये प्रतिलिटर या दरात आणि गायीच्या दुधाची 23 ते 24 रुपये प्रतिलिटर या दरात खरेदी केली जात आहे. इंधन मिळण्यातील अडचणी, वाढती मजुरी, मजुरांचा अभाव व दुग्धजन्य पदार्थ वितरण, विक्रीची विस्कळित साखळी, अशी कारणे खासगी डेअरीचालक दूध खरेदी दर कमी करण्यासंबंधी देत आहेत. जिल्ह्यात सुमारे चार लाख लिटर दुधाची खरेदी विक्रीची उलाढाल खासगी डेअरीचालक, किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून होत असते. 

जिल्हा दूध संघाचे दर स्थिर 
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे खरेदी व विक्री दर स्थिर आहेत. संकलनही सध्या सव्वातीन लाख लिटर दूध संकलन असून, त्यात कुठलीही घट झालेली नाही. परंतु विक्री मागील काही दिवसांत प्रतिदिन 50 हजार लिटरने कमी झाली आहे. संघाच्या दुधासह दुग्धजन्य पदार्थांची विक्री बुलडाणा, नाशिक, औरंगाबाद, अकोला येथेही केली जाते. रोज दीड लाख लिटर दुधाची विक्री होत होती. ती सध्या एक लाख लिटरपर्यंत होत आहे. जळगाव शहरासह इतर भागात दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीची दुकाने सकाळी व सायंकाळीच सुरू असतात. ती 24 तास सुरू राहायला हवीत. जे दूध अतिरिक्त ठरत आहे, त्यापासून लोणी, पावडर तयार केले जात आहे. त्यासाठी आवश्‍यक सामग्री, निर्मिती खर्च वाढला आहे. त्याचा साठाही वाढू लागला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com