जलसंधारणासाठी अवघाचि गाव एकवटला

नरेश हळणोर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने ग्रस्त. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही आजही गावात महामंडळाची बस येत नाही. मात्र, आपल्या गावची निदान पाण्याची सोय व्हावी याच उद्देशाने याच गावचे पण सध्या नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पुढाकार घेतला आणि पाहता-पाहता सारा गाव जलसंधारणाच्या कामालाच जुंपला आहे.

नाशिक : दुष्काळी जिल्हा म्हणून परिचित असलेल्या बीडमधील अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारुर, जि. बीड) गाव वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईने ग्रस्त. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही आजही गावात महामंडळाची बस येत नाही. मात्र, आपल्या गावची निदान पाण्याची सोय व्हावी याच उद्देशाने याच गावचे पण सध्या नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पुढाकार घेतला आणि पाहता-पाहता सारा गाव जलसंधारणाच्या कामालाच जुंपला आहे. येत्या 27 एप्रिल ते 1 मे यादरम्यान गावाने श्रमदानाचा उपक्रम राबविला असून यामध्ये गावातून परगावी स्थायिक झालेल्यांसह, परगावी लग्न करून गेलेल्या मुली आपल्या कुटूंबियांसह या श्रमदानात सहभागी होणार आहेत. 

 अहमदनगर - बीड आणि बीड-दौंड या दोन महामार्गांच्या मध्ये अवघ्या दीडशे-दोनशे लोकवस्तीचे हसनाबाद (ता. धारूर, जि. बीड) हे गाव. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटली तरी अद्यापही गावात बस येत नसल्याने महामार्गावर उतरून अडीच-तीन किलोमीटरची पायपीट आजही करावी लागते. दुष्काळाची दुर्भीक्ष पाचवीला पूजलेले असल्याने पावसाळी पिकांवरच गावाची गुजराण. तरीही आजतागायत तग धरून असलेल्या गावात आजही रुढीपरंपरा कायम आहेत. गावालगतच नदी परंतु, तिच्यावर बंधारा नाही. त्यामुळे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे पाणी वाहून जाते. 

   गावचे मूळ रहिवाशी असलेले व सध्या नाशिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी गावातील तरुणाईला एकत्रित करीत गावात जलसंधारणाचा उपक्रम राबविण्याची संकल्पना मांडली. गावातून प्रशासकीय सेवेत असणारे श्री. नखाते यांच्याप्रमाणेच एक नायब तहसिलदारही. त्यांनाही श्री. नखाते यांनी संगतीला घेत गाव पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी जलसंधारणाचा उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला. 
.... 
अन्‌ तरुणाई एकवटली 
"पाणी फाऊंडेशन'च्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन श्री.नखाते यांनी हसनाबादही पाणीटंचाईपासून मुक्त करण्याचा संकल्प घेतला. त्यासाठी गावातील तरुणाईला एकत्रित करीत जलसंधारण कामाची संकल्पना समजावली. त्यासाठी तरुणाईने परिश्रम करण्याची तयारी दाखविली, परंतु आर्थिक तिढा होती. त्यासाठी श्री. नखाते यांनी आपल्या जनसंपर्काच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन केले अन्‌ स्वत:ही आर्थिक मदतीला उभे राहिले. पाहता-पाहता आर्थिक मदत उभी राहिल्याने गेल्या ऑक्‍टोबर 2017 पासून सुरू झालेले काम प्रगतीपथावर पोहोचले आहे. सीसीटी, डीप सीसीटी, छोटे बंधारे, बांध बंदिस्थी अशी कामे श्रमदानातून उभी राहिली. यात गावकऱ्यांसह महिलांनीही मोठा हातभार लावला आहे. 
 

27 पासून चार दिवस... 
येत्या 27 एप्रिल ते 1 मे या चार दिवसांसाठी कुटूंबियांसह श्रमदानाचा उपक्रम आखला आहे. परगावी नोकरी-व्यवसायानिमित्ताने स्थायिक झालेले अन्‌ परगावी लग्न करून गेलेल्या मुलीही आपल्या कुटूंबिय-मुलांबाळांसह हसनाबादला येणार आणि श्रमदान करणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच हसनाबादचे जलसंधारणाची कामे पूर्ण झाली तर पावसाळ्यातील पाणी आडून जमीनीची पाणीपातळी वाढणार आहे. यावर्षी नाही तर पुढल्या वर्षी या गावचे चित्रच बदलेले दिसणार अशी साऱ्यांचीच अपेक्षा आहे. 

आपलंही गाव पाणीटंचाईपासून मूक्त व्हाव हीच एक अपेक्षा. त्यासाठीचा हा केलेला छोटाचा प्रयत्न आहे. प्रयत्नांना यश येते आहे. त्यानिमित्ताने गाव एकजूट झाले हेही फार महत्त्वाचे. तरुणाईची इच्छाशक्तीचा वापर चांगल्या कामासाठी केला तर अशक्‍य काहीच नाही. 
- अशोक नखाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक. 

Web Title: marathi news jalsandhran village