मंत्री महाजनांविरोधात कॉंग्रेस आघाडीची जोरदार तयारी 

सुरेश महाजन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

लागोपाठ तब्बल पाच विधानसभा निवडणुकांच्या आखाड्यात विरोधकांना विद्यमान मंत्री गिरीश महाजनांकडून पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंत्री महाजनांना कडवी लढत देण्यासाठी कॉंग्रेस आघाडीतर्फे वेगवेगळ्या पातळ्यांवर का होईना जोरदार तयारी सुरू आहे. तसे पाहिले तर भारतीय जनता पक्षाच्या ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांपासून ते विश्‍वासातील प्रमुख पदाधिकाऱ्यांपर्यंतचे मतदारसंघात अभेद्य "नेटवर्क' सक्रीय असल्याने या नेटवर्कला भेदणे विरोधकांना तितकेसे सोपे खचितच नाही.

लागोपाठ तब्बल पाच विधानसभा निवडणुकांच्या आखाड्यात विरोधकांना विद्यमान मंत्री गिरीश महाजनांकडून पराभव पत्करावा लागला आहे. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंत्री महाजनांना कडवी लढत देण्यासाठी कॉंग्रेस आघाडीतर्फे वेगवेगळ्या पातळ्यांवर का होईना जोरदार तयारी सुरू आहे. तसे पाहिले तर भारतीय जनता पक्षाच्या ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांपासून ते विश्‍वासातील प्रमुख पदाधिकाऱ्यांपर्यंतचे मतदारसंघात अभेद्य "नेटवर्क' सक्रीय असल्याने या नेटवर्कला भेदणे विरोधकांना तितकेसे सोपे खचितच नाही. तरीही निवडणुका आल्या म्हणजे विरोधकांचा, त्यांनी उपस्थित केलेल्या लोकहिताच्या मुद्यांनाही तेवढ्याच जिकिरीने सत्ताधाऱ्यांना सामोरे जावे लागते. तसेच काही मुद्दे विरोधकांकडून गेल्या दीड-दोन वर्षांत सातत्याने मांडले जात आहेत. त्यात किती तथ्य आहे, याचा उलगडा विधानसभा निवडणूक रणधुमाळीदरम्यान होणारच आहे. गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी वेळोवेळी विविध लोकहिताच्या मुद्यांवर आंदोलने, मोर्चे काढून कॉंग्रेस आघाडीला मतदारसंघात सक्रीय ठेवले. 

आघाडी, युतीचे त्रांगडे अद्याप कायम 
राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा येत्या आठवड्यात होऊ शकते. आघाडीच्या व युतीच्या हाती एवढा कमी कालावधी असला तरी युती (भाजप-सेना), आघाडी (कॉंग्रेस-राष्ट्रवादी) यांच्यात अद्याप जागांच्या देवाणीचा अंतीम निर्णय घोषित झालेला नाही. तरीही मतदारसंघात भाजपतर्फे जोरदार तयारी सुरू असून, दुसरीकडे दोन्ही कॉंग्रेसचे संभाव्य उमेदवार विविध कार्यक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे अर्थातच मंत्री गिरीश महाजन यांची उमेदवारी पक्की आहे, तर आघाडीतर्फे मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला आला तर तालुकाध्यक्ष शरद त्र्यंबक ऊर्फ एस. टी. पाटील, शंकर शिवलाल राजपूत, मूलचंद नाईक, ज्योत्स्ना सुनील विसपुते आदींची नावे सध्या तरी आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संजय गरुड यांचेच नाव सर्वाधिक चर्चेत आहे, त्यानंतर तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर पाटील, अभिषेक शांताराम पाटील आणि बंगालीसिंग चितोडिया यांची नावे विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहेत. शिवसेनेतर्फे जिल्हा उपप्रमुख डॉ. मनोहर पाटील, दीपकसिंग राजपूत आदींची नावेही पुढे येत आहेत. जर युती, आघाडीची घोषणा झाली तर यातील बरीच नावे उमेदवारीच्या स्पर्धेतून बाद होतील. संजय गरुड, ज्योत्स्ना विसपुते, डॉ. मनोहर पाटील यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा दांडगा अनुभव पाठीशी आहे. हा अनुभव कितीही असला तरी लढत राज्याचे दिग्गज मंत्री गिरीश महाजनांशी द्यावी लागणार आहे. मतदारसंघात गेल्या पंचवीस वर्षांत कोट्यधींची विकासकामे झाली. काही प्रगतिपथावर असून, शहरातही सुमारे दोन-अडीचशे कोटींच्या खर्चाची कामे सुरू आहेत. आता प्रश्‍न विरोधकांकडून विचारल्या जातो, त्यात शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, नुकसान भरपाई, बेरोजगारीवरची मात अद्याप का झाली नाही. यावर सत्ताधारी भाजपतर्फे अर्थातच पक्षाचे सर्वेसर्वा मंत्री महाजन आणि पदाधिकारी काय उत्तर देतात, याकडे मतदारांचे लक्ष असले तरी यावेळची विधानसभा निवडणूक जरा हटकेच होणार असल्याचे संकेत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner mahajan congress aaghadi