जामनेरात अल्पसंख्याक समाजाचे गट भिडले: दहा जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

सकाळी दहा वाजेच्या सुमारास अल्पसंख्यांक समाजाच्या दोन गटातील किरकोळ कारणावरून धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटांमधील आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले.

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर येथे अल्पसंख्याक समाजातील दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यात आठ ते दहा जण जखमी झाले असून त्यांना जळगाव येथे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. 
जामनेर शहरातील अराफत चौकात सकाळी दहा वाजेच्या सुमारास अल्पसंख्यांक समाजाच्या दोन गटातील किरकोळ कारणावरून धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटांमधील आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले. या सर्वांना उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर अराफत चौकातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी बंदोबस्तात आहेत. 

रात्रीचा वाद उफाळला 
एका गटातील महिलेला धक्का लागल्याच्या कारणावरून रात्री शाब्दिक वाद झाला होता. हा किरकोळ वाद त्याचवेळी मिटविण्यात आला होता. परंतु, ज्या महिलेला धक्का लागला त्या गटाकडून पुन्हा सकाळी वाद होऊन दोन्ही गटात धारदार शस्र व काठ्या वापरून एकमेकांवर हल्ला चढवला. काठ्या, कुऱ्हाड घेवून दोन्ही गट आमने सामने आले होते. यात शेख जमील शेख रसूल, अबीद शेख खालिद, अजीम शेख जालीम, शेख युनूस, शेख जलील शेक सईद, शेख अल्ताफ शेख सईद यांच्यासह आणखी काहीजण जखमी झाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner muslimeen samaj two gut Affecting today ten enjurd