मंत्री महाजनांचे वर्चस्व, विरोधक अस्तित्वाच्या शोधात 

मंत्री महाजनांचे वर्चस्व, विरोधक अस्तित्वाच्या शोधात 

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळच्या निवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचा दावा केला जात असला तरी जामनेर विधानसभा मतदारसंघात मात्र मोदी लाटेबरोबरच गिरीश महाजन लाटही नव्याने अस्तित्वात आल्याचे गेल्या पाच वर्षांतील विविध निवडणूक निकालांवरून अधोरेखित होते. राज्याच्या राजकारणात महाजनांचे वर्चस्व वाढल्यानंतर त्याचा स्वाभाविक प्रभाव जामनेर मतदारसंघातही दिसून येत असून, या क्षेत्रात भाजपला मात देणे तर दूरच, विरोधकांचा अस्तित्वासाठीच संघर्ष सुरू असल्याचे चित्र आहे. 

गेल्या पाच वर्षांत ज्या-ज्या प्रमुख संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपनेच निर्विवाद वर्चस्व राखले. कृषी उत्पन्न बाजार समिती असो वा शेतकरी सहकारी संघ, शिवाय तालुक्‍यातील ऐंशी ते नव्वद टक्‍क्‍यांवर ग्रामपंचायतीवर भाजपचाच वरचष्मा आहे. दहा महिन्यांपूर्वी झालेल्या जामनेर पालिकेच्या निवडणुकीत तर मंत्री महाजनांच्या नेतृत्वाखाली 25 पैकी 25 जागांवर भाजपने क्‍लीन स्विप केला. एवढेच काय तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरुड यांच्या हक्काचा बालेकिल्ला म्हणून गणना होणाऱ्या शेंदुर्णीतही विजयश्री खेचून आणली. 

शिवसेना कागदावर, विरोधक नावालाच! 
राज्यात व केंद्रामध्ये शिवसेना सत्तेत असली तरीही तालुक्‍यातील अस्तित्व फक्त कागदावरच दिसून येते, दुसरीकडे राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची केवळ धडपड सुरू आहे. ती आप-आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यापलीकडे काहीच नाही. मध्यंतरीच्या काळात त्यांचे अनेक बिनिच्या शिलेदारांनी मंत्री महाजनांचे नेतृत्व मान्य करून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते व माजी खासदार ईश्वरलाल जैन हेदेखील मंत्री महाजनांच्या मतदार संघात त्यांचे व त्यांच्या विकास कामांचे कौतुक करताना थकत नाही हे येथे उल्लेखनीय. याचाही बहुतांशवेळी फायदा भाजपलाच होतो. 

खासदारांचा नियमित संपर्क 
जामनेर मतदारसंघात रावेर मतदार संघाच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे या पाच वर्षात अनेकदा येऊन गेल्यात. त्यात विकास कामांचे भूमिपूजन असो वा उद्‌घाटने आणि पक्षीय पातळीवरील कार्यक्रम असो, त्यांची सक्रियता महत्त्वाची ठरली. त्यांनी विविध गावांमध्ये खासदार विकासनिधी पोचवून आपली छाप सोडल्याचे दिसते. 

मतदारसंघाचा इतिहास 
तालुकाभरात गत काळातील विचार करता आबाजी नाना पाटील, नारायण किसन पाटील, आचार्य गजाननराव गरुड, बाबुसिंग दगडूसिंग राठोड, दत्तात्रय वामन महाजन हे मतदारसंघाला आमदार म्हणून लाभले होते. त्या-त्यावेळी त्यांनी केलेली विकास कामे आणि वाढती लोकसंख्या, जनतेच्या पुढाऱ्यांकडून वाढलेल्या वास्तव अपेक्षा हाही मुद्दा प्रत्येक निवडणुकीत प्रभावी ठरतो, तसा तो याही लोकसभा निवडणुकीत नक्कीच पुढे येणार आहे. 

शहरात कामे, तालुका उपेक्षित 
जामनेर शहराच्या दृष्टीने जोमाने विकासकामे सुरू आहेत. चौपदरीकरणासह भुयारी गटार योजना, सार्वजनिक शौचालये, पथदिवे, सामाजिक सभागृह (मंगल कार्यालय), सोनबर्डी विकास योजना, जागो-जागी व्यापारी संकुले अशा विविध विकासकामांच्या बळावर भाजपची सर्व भिस्त आहे. महाजनांचा मतदारसंघ असल्याने जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही यात्रा येऊन गेल्या. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरेंसारखे मोठे होते. त्यानंतर आघाडीतील दोन्ही कॉंग्रेस पक्ष किती सावरलेत, हे येत्या लोकसभेच्या आणि त्यानंतर चार-पाच महिन्यांत होणाऱ्या महत्त्वपूर्ण अशा विधानसभा निवडणुकीतून दिसून येईल. 

मतदारसंघातील प्रश्‍न 
- जलसंपदामंत्री असूनही टंचाई 
- पुरेशा सिंचनाअभावी शेती अडचणीत 
- टेक्‍स्टाईल पार्कची घोषणा हवेतच! 
- जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरण थंड बस्त्यात 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com