जिद्द-रत्नप्रभाताईंच्या जिद्दीची हैदराबादमध्ये दखल   

विजयकुमार इंगळे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

नाशिक-घरात अठराविश्‍वे दारिद्य्र. पती, मोठा मुलगा गेला. कुटुंब उघड्यावर येत नशिबी शेतमजुरी आली. मात्र, कुटुंबातील सून, नातू आणि मुलगा, मुलीसाठी भक्कमपणे उभे राहत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातून लघुउद्योगाचे प्रशिक्षण घेत आवळा कॅन्डी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. केंद्राने जिद्दीला प्रोत्साहन दिले. व्यवसायातील प्रामाणिकतेला व्यवसायवृद्धीची जोड मिळाली अन्‌ प्रारंभी दिल्लीपर्यंत जाण्यासाठी भीती वाटणाऱ्या रत्नप्रभाताईंनी आत्मविश्‍वासाच्या जोरावर पंजाब, हरियाना, छत्तीसगडसह राज्यातील अन्यही भागांत आवळा कॅन्डीला पोचवले. 

नाशिक-घरात अठराविश्‍वे दारिद्य्र. पती, मोठा मुलगा गेला. कुटुंब उघड्यावर येत नशिबी शेतमजुरी आली. मात्र, कुटुंबातील सून, नातू आणि मुलगा, मुलीसाठी भक्कमपणे उभे राहत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रातून लघुउद्योगाचे प्रशिक्षण घेत आवळा कॅन्डी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. केंद्राने जिद्दीला प्रोत्साहन दिले. व्यवसायातील प्रामाणिकतेला व्यवसायवृद्धीची जोड मिळाली अन्‌ प्रारंभी दिल्लीपर्यंत जाण्यासाठी भीती वाटणाऱ्या रत्नप्रभाताईंनी आत्मविश्‍वासाच्या जोरावर पंजाब, हरियाना, छत्तीसगडसह राज्यातील अन्यही भागांत आवळा कॅन्डीला पोचवले. 

रत्नप्रभा आनंदा वाघ... माहेर दुगाव, तर सासर विंचूर... दोन्ही निफाड तालुक्‍यातील... शिक्षण केवळ सहावी पास... वडील किसन श्रावण रणभोर रेल्वेत होते. मात्र, घरातील एकटेच शिकलेले आणि तुटपुंजा पगार. त्यात रणभोर यांचे कुटुंब मोठे होते. त्यांनी मुलांना गावीच ठेवले होते. रत्नप्रभाताई अभ्यासात हुशार होत्या. मात्र, तीन बहिणी व दोन भाऊ अशा परिवारात जबाबदारी कमी करण्यासाठी वडिलांनी रत्नप्रभाताईंचे लग्न लवकर करून केले. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटले. तो काळ होता 1972 चा. पती अशोक वाघ यांचेही शिक्षण जेमतेम अकरावी. लग्नानंतर सासरी आल्या तर खायची भ्रांत. झोपडीत राहणारे अशोक वाघ यांच्या कुटुंबाचा पसारा सासू-सासऱ्यांसह सात बहिणी व तीन भावांचा. शेती तुटपुंजी. रोजचा दिनक्रम म्हणजे सारं कुटुंब मजुरीला जाणे..

जरूर वाचा-ती रूग्णालयाकडे निघाली अन् रूग्णवाहिकेतच दिला तिळ्यांना जन्म

. नेहमीच अडचणींवर मात 

पोटाची खळगी भरण्यासाठी रत्नप्रभाताईंनी पती अशोक यांच्यासह मुंबई गाठले. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकरनगरात भाडेतत्त्वावरील झोपडीत संसार थाटला... दोघेही कमी शिकलेले असल्याने सुरवातीला गारमेंट फॅक्‍टरीत नोकरी केली. पगार फक्त साडेतीनशे रुपये... मात्र, गारमेंट फॅक्‍टरी बंद पडल्याने दोन्हीही बेरोजगार झाले. सहा महिने काम नसल्याने कुटुंबाला एकवेळचे खायलाही महाग झाले होते. मात्र, रत्नप्रभाताईंनी शिवणकाम शिकून कुटुंबाला आधार देण्याचे काम केले. याच काळात मुंबईच्या आयओबी बॅंकेत शिपाईपदासाठी अशोक यांनी अर्ज केला. शिपाई म्हणून नोकरी मिळाली, पण पगार होता फक्त तीन हजार... घरात मुले प्रशांत, विशाल आणि अनुश्री यांच्यानिमित्ताने सदस्यसंख्या पाच वर गेली. याच काळात बारावीच्या शैक्षणिक पात्रतेवर मुलगा प्रशांत यालाही याच बॅंकेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली. कुटुंब स्थिर होत असतानाच अशोक यांची प्रकृती बिघडली. आजारपणात नोकरी गेली. त्यामुळे रत्नप्रभाताईंनी थेट विंचूर गाठले.

प्रत्येक पाऊल टाकले आत्मविश्वासाने

मुलगा प्रशांत मुंबईत नोकरी करत होता. मात्र, कुटुंब विंचूर येथे परत आले. त्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठा मुलगा प्रशांत याच्याही पांढऱ्या पेशी वाढल्याने नियतीने दुसरा आघात त्यांच्या कुटुंबावर केला. कुटुंबातील मुलगा व पतीच्या जाण्याने मात्र रत्नप्रभाताई पुरत्या खचल्या होत्या. प्रशांतच्या जाण्याने सून रेखा आणि चिमुकला नातू बापाविना निराधार झाला. रत्नप्रभाताईंनी स्वतः आईची भूमिका निभावत आपल्या सुनेचा पुनर्विवाह करून देत समाजात आदर्श उभा केला आहे. मोठ्या मुलाची आठवण असलेल्या नातवाला खूप शिकवत मोठा अधिकारी करायचे स्वप्न त्या बाळगून आहेत. नातवाने गेल्या वर्षी दहावीत 86 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याचे त्या अभिमानाने सांगतात. त्याही जिद्दीच्या जोरावर इंग्रजी वाचायला शिकल्या आहेत. 

रत्नप्रभाताईंची दखल हैदराबादपर्यंत 
कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने सुरू झालेला हा प्रवास थेट हैदराबादपर्यंत पोचला होता. त्यांनी स्वामिनाथन पुरस्काराने त्यांचा गौरव केला. देशातील अतिशय मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराने मात्र रत्नप्रभाताईंना मागे वळून बघण्याची गरज राहिली नाही. मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील, प्रा. अर्चना देशमुख, तसेच डॉ. नितीन ठोके व सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळामुळे हे शक्‍य झाल्याचे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले. 

तनिष्कांसाठी काम करायचंय 
आवळा कॅन्डीच्या व्यवसायात रोजगाराच्या अनेक संधी असल्याने महिलांना आवळा कॅन्डी तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवणकामाच्या माध्यमातून विंचूर परिसरातील सुमारे पंधरा महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला. आयुष्यात आलेल्या प्रसंगांना सामोरे गेलो तर कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही, असे त्या आवर्जून सांगतात. 
संपर्क ः रत्नप्रभा वाघ ः 9881312690 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jiddh ratnprabha aavla candy profession