जिद्द-झोपडपट्ट्यांचा आधार बनल्यात मायाताई 

residentional photo
residentional photo

परिस्थितीने शाळाचे तोंडही पाहाता आले नाही. दुष्काळी भागात जन्माला आल्याने शेतमजूर म्हणून जगण्याशिवाय पर्याय नव्हता. पोटाची भूक भागविण्यासाठी नाशिक गाठले. मात्र नाशिकच्या झोपडपट्ट्यांनी आधार देत तिला घडविले. केवळ आधारच नाही, तर सामाजिक जाणिवेतून झोपडपट्ट्यांनी दिलेल्या आधारातून थेट बिजिंग गाठलंय ते मायाताई यांनी... 

माया खोडवे... माहेर मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील देवडे हातगावचे, तर सासर नाशिकच्या आम्रपाली झोपडपट्टीतील. शाळेची पायरीही न चढलेल्या मायाताई यांनाही परिस्थितीने झुंजविले. शिवाजी रामजी गायकवाड यांचं सात जणांचं कुटुंब. पती- पत्नी आणि तीन मुली, दोन मुलांचं कुटुंब. परिस्थितीमुळे वडिलांनी मायाताईंचे लवकर लग्न केले. सासरीही परिस्थिती जेमतेम. झोपडपट्टीतील आयुष्यात पुन्हा वाट्याला दारिद्य्र आल्यानं एक वेळ खायचीही भ्रांत. कुटुंबातील अन्य सदस्यांसह कष्ट उपसण्याशिवाय पर्याय नव्हता. झोपडपट्टीने भाकरी कमवायला शिकवलं. मायाताई कामासाठी पुढे सरसावल्या. काम होतं कचरा डेपोत कचरा विलगीकरणाचं. रोजची मजुरी पन्नास रुपये. मात्र या कामात महिलांना होणाऱ्या आजारांची कल्पना नाही, हे मायाताईंच्या लक्षात आलं. 

महिलांच्या संघटनेनं दिलं बळ 
याच काळात पंचवटीत नाशिकमध्ये कचरा वेचणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, या उद्देशानं संस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेने कचरा वेचणाऱ्या महिलांच्या हक्कांपासून त्यांच्या आरोग्याबरोबरच साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतला. याच ठिकाणी मात्र मायाताई यांच्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत पेटली. संस्थेतर्फे महिलांना हॉबी क्‍लासेसचे प्रशिक्षण देण्याबरोबरच साक्षरतेसाठी प्रयत्न सुरू होते. यातूनच मायाताईंनी लिहिता, वाचता येण्याबरोबरच अभिव्यक्ती संस्थेच्या माध्यमातून कॅमेरा हाताळण्याचं प्रशिक्षण पूर्ण करत स्वतःला सिद्ध केलं. जगण्याच्या लढाईत सामाजिक काम करतानाच आर्थिक स्रोत मिळण्यासाठी व्हिडिओ व्हॅलेंटिअर्स या संस्थेनं मायाताईंना मदत केली. या संस्थेसाठी कम्युनिटी रिपोर्टिंग करताना समाजाच्या प्रश्‍नांबरोबरच त्यांना कष्टाची कमाईही या माध्यमातून मिळू लागल्याने मोठा आधार निर्माण झाला होता. स्वतःबरोबरच समाजातील उपेक्षित घटकांसाठी आधार म्हणून मायाताई काम करू लागल्या. महिलांच्या रेशनकार्डपासून ते त्यांच्या सर्वच अडचणींत त्या मदत करू लागल्या. शहरातील प्रमुख असलेल्या भीमवाडी, श्रमिकनगर, गंजमाळ, सातपूर, प्रबुद्धनगर, संत कबीरनगर, आम्रपाली, वडाळा, पंचशीलनगरमधील झोपडपट्ट्यांमधील महिलांसाठी मायाताई खोडवे जगण्याच्या आधार ठरल्या. मायाताई यांनी समाजजीवनाचं वास्तव चित्रीत करत सुमारे 70 पेक्षाही अधिक डॉक्‍युमेंटरी तयार केल्या आहेत. यातील अनेक डॉक्‍युमेंटरीची जागतिकस्तरावर दखल घेत मायाताई यांना मानसन्मान मिळाले आहेत. 


परदेशात जाण्याची संधी 
मराठवाड्यातून नाशिकमध्ये आल्यानंतर रिक्षाचालकांच्या खाकी गणवेशालाही घाबरणारी मायाताई डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाने प्रेरित होऊन खंबीर बनल्या होत्या. जगण्याच्या लढाईत मायाताई यांनी महिलांसाठी लिक्विड, फिनाईल, अगरबत्ती तयार करण्याच्या प्रशिक्षणाबरोबरच महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र झोपडपट्टीत उभारले. यात कायद्याच्या कचाट्यातील न सुटणारे कौटुंबिक प्रश्‍न तडजोड करत निकाली निघू लागले. उपेक्षितांसाठी काम करणाऱ्या मायाताई आता कॅमेऱ्याच्या आणि शूटिंगच्या माध्यमातून वंचितांचे प्रश्‍न समाजासमोर मांडू लागल्या. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्याबरोबरच कचरा गोळा करणाऱ्या महिलांचे प्रश्‍न समाजासमोर मायाताई यांच्यानिमित्ताने येऊ लागले. याच विषयावरील अभ्यास दौऱ्यासाठी मायाताई खोडवे यांची परदेशात निवड झाली होती. साक्षर झालेल्या मायाताई यांच्यासाठी परदेशातील संधी म्हणजे स्वप्न होते. मात्र ते सत्यात उतरताना पासपोर्ट, व्हिसा यासाठी स्वतःच पुढे आल्या. 

प्रसारमाध्यमांकडून दखल 
समाजाचे वास्तव मांडण्याबरोबरच वंचित घटकांना काम करणाऱ्या मायाताई जागतिकस्तरावर जाऊन पोचल्या होत्या. केवळ समस्या मांडणाऱ्या कॅमेरामन नाही तर समस्यांचे निराकरण करणाऱ्या मायाताई, अशी त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. मायाताई यांच्या कार्याची देश-परदेशातील प्रसारमाध्यमांनी दखल घेत जागतिकस्तरावर नेले. 

मायाताईंची भूमिका लवकरच पडद्यावर 
आयुष्यातील संघर्षात नेहमीच सकारात्मक विचार करत समाजमन जपणाऱ्या मायाताई खोडवे यांची भूमिका असलेला "सपान सरलं...' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. ग्रामीण जीवनाचं वास्तव मांडत समाजाला बळ देण्याचं काम या चित्रपटाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्या सांगतात. चित्रपट अंतिम टप्प्यात असला तरी चित्रपटासाठी तीन वेळा फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेत तो पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. समाजाचे वास्तव, नागरी प्रश्‍न, महिलांच्या समस्या सातत्याने मांडत त्यांनी झोपडपट्टीतील महिलांसाठी मोठा आधार दिला आहे. 


मोफत प्रशिक्षण देणार 
शासनातर्फे महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र अनेकदा उपेक्षित घटकांमधील महिलांना याबाबतची कल्पना नसल्याने त्यांच्यापर्यंत योजना पोचत नाहीत. बचत गटांच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याबरोबरच रोजगाराच्या कायमस्वरूपी संधी उपलब्ध करून देण्यासाठी मायाताई प्रयत्नशील आहेत. तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असलेल्या गरजू मुलींना चित्रीकरणाचे मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी मायाताई यांनी घेतलीय. 

संपर्क ः माया खोडवे - 7057438836

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com