जिद्द-आदिवासींची माउली... आमदार पत्नी ताराबाई 

residentional photo
residentional photo


उपेक्षित आदिवासी समाजबांधवांना प्रवाहात आणणारं... चोर, दरोडेखोरांना भक्तिमार्गात, तर आमदाराच्या पत्नी मिरवून न घेता समाजजागृतीसाठी वाहून घेतलेलं, नाव म्हणजे ताराबाई बागूल... 

ताराबाई रामदास बागूल... माहेर फोफशी (ता. दिंडोरी) येथील तर सासर कळवण तालुक्‍यातील... सध्याचे वास्तव्य घनशेत (ता. पेठ). शिक्षण चौथी पास... आदिवासी कुटुंबात जन्मालेल्या ताराबाई यांचा विवाह लवकर झाला. पती रामदास बागूल यांचे शिक्षण सातवी पास... बागूल यांच्या घराण्याला ब्रिटिशकालीन राजकीय वारसा लाभलेला होता. कळवण, बागलाण, पेठ, सुरगाणा तालुक्‍यांत बागूलांना जहागिरी मिळालेली होती. मात्र भाऊबंदकी वेगळी झाल्याने बागूल कुटुंब रोजगारानिमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. नशिबी आले ते फक्त कष्ट... पती रामदास बागूल मुल्हेर येथील डांग सेवा मंडळाच्या शाळेत नोकरीस लागले. पगार तुटपुंजा... आदिवासी कुटुंबात जन्माला येत कष्ट करण्याशिवाय पर्याय नव्हता. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ताराबाईही मजुरी करून हातभार लावत होत्या. कुटुंबाची जबाबदारी पुढे नेत असतानाच पती रामदास यांनी नोकरीचा राजीनामा दिला. मात्र ताराबाई कुटुंबासाठी आधार बनल्या. घरात मुलगा राजेंद्र यांच्यानिमित्ताने जबाबदारी वाढली होती. 

प्रवास आमदारकीचा... 
साधारणतः 1955 मध्ये नवीन विधानसभा मतदारसंघ पेठ-सुरगाणा-दिंडोरी-चांदवड निर्माण करण्यात आला. आदिवासी भागातील धडाडीचा कार्यकर्ता, समाजाची जाण असलेल्या रामदास बागूल यांना आदिवासी समाजबांधवांनी आमदार म्हणून निवडून आणले. आमदार म्हणून जबाबदारी पुढे नेताना केवळ समाजाप्रति असलेली निष्ठा जपत ताराबाई यांनी रामदास बागूल यांना खंबीर साथ दिली. आदिवासी बांधवांची सेवा करणाऱ्या बागूल कुटुंबाने केवळ समाजजागृतीसाठी आपल्याला जबाबदारी मिळाली असे मानून फक्त या भागातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य खर्च केले. मात्र हे सर्व करत असतानाच शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी भागात आश्रमशाळांची निर्मिती केली. आमदार पदाचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच रामदास बागूल वारकरी संप्रदायाकडे ओढले गेले. यात ताराबाई यांचा मोलाचा वाटा होता. 
वारकरी संप्रदायात प्रवेश करत असतानाच रामदास बागूल यांनी आपल्या पाचही आश्रमशाळा शासनाकडे सोपवत संसाराचा त्याग केला. कुटुंबाने थेट नाशिक गाठले. कीर्तनाच्या माध्यमातून कुटुंब आदिवासी बांधवांसाठी झटत होता. मात्र परिवाराला भाकरीची भ्रांत होतीच. लोकांनी दिलेल्या शिद्यावर कुटुंब गुजराण करत होते. नाशिकमध्ये कुटुंबाने स्थिर होण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. पुन्हा कुटुंब पेठ तालुक्‍यातील घनशेत येथे राहायला आले. भक्तिमार्गात आदिवासी समाजाला आणण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून रामदास बागूल यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र याच काळात श्री. बागूल यांचे निधन झाले. 
पती रामदास बागूल यांच्या निधनानंतर मात्र ताराबाई यांनी सामाजिक जबाबदारी पेलवत आदिवासी बांधवांना आधार देण्यात कसलीच कसूर ठेवली नाही. वारकरी संप्रदायाचा वसा पुढे नेत अडचणींना संधी मानून त्यांनी गावोगावी जाऊन प्रबोधनासाठी आपले आयुष्य समर्पित केले. स्वमालकीच्या पाच आश्रमशाळा गेल्याचे कोणतेही दुःख न बाळगता त्या झटत होत्या. 

दरोडेखोर, चोरांना प्रवाहात आणले 
शिक्षणापासून वंचित असलेल्या आदिवासी समाजात व्यसनाधिनता, दारिद्य्रामुळे या भागात चोर, दरोडेखोरांना मुख्य प्रवाहात आणणे जिकिरीचे होते. मात्र ताराबाई यांनी समाजजागृतीचा वसा घेत अहोरात्र समाजजागृतीसाठी स्वतःला वाहून घेतले. परिसरातील दरोडे घालणाऱ्या टोळ्यांपासून ते भुरट्या चोरांपर्यंत ताराबाई पोचल्या. अशा कुटुंबातील सदस्यांसह सर्वांना विश्‍वासात घेत त्यांनी मन वळविण्यात यश मिळवले. 

रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यात यश 
चोरी किंवा दरोडे टाकल्याने आयुष्य निघणार नाही, हे पटवून देतानाच या भागातील आदिवासी कुटुंबांना वनजमिनी मिळवून देण्यापासून ते भूमिहिनांसाठी ताराबाई आधार ठरल्या. आदिवासी समाजातील पहिल्या कीर्तनकार म्हणून ख्याती मिळवतानाच त्यांनी या समाजातील युवकांनाही वारकरी संप्रदायात आणले. समाजबदलाच्या ताराबाई यांच्या प्रयत्नांना यश येत दुर्गम भागातील आदिवासी समाज शेतीसोबतच स्ट्रॉबेरीसारख्या आधुनिक उत्पादनाकडेही वळला आहे. ताराबाई यांच्या वारकरी संप्रदायातून आज सुमारे 100 च्यावर युवक कीर्तनकार म्हणून प्रबोधन कार्यात योगदान देत आहेत. ताराबाई यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 2013 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना समाजगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदिवासी भागातील ताराबाई यांचे भरीव योगदान आदिवासी बांधवांसाठी नक्कीच अभिमान वाटावा, असेच आहे. 


आदिवासी महिलांसाठी मोठे काम उभे करायचंय 
वारकरी संप्रदायात योगदान देतानाच ताराबाई बागूल यांनी या भागातील जंगलसंपदा टिकून राहण्यासाठी आदिवासी कुटुंबांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. कुटुंबावर येणाऱ्या प्रसंगातून धडा घेत प्रत्येकाने कर्तव्य मानून आपले योगदान दिलेच पाहिजे, खचून न जाता येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्लाही ताराबाई देतात. 
संपर्क ः ताराबाई बागूल- 8275126134, 9420903991 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com