#Motivational फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार....सुरेखाताईंनी घडवले कुटूंब

residentional photo
residentional photo

नाशिक-सभोवतालची परिस्थिती अवघड असली तरीही ध्येय गाठण्यासाठी, यश मिळविण्यासाठी अविरतपणे कष्ट करण्याच्या तयारीनिशी अनेक महिला धडपडत असतात. स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक प्रसंगाला जिद्दीने सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. दुःख असो वा दारिद्य्र, याचे रडगाणे न गाता वेदनांना आपलेसे करत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःला सिद्ध करणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे सुरेखाताई ठाकरे..! 
    सुरेखा शिवाजी ठाकरे... शिक्षण फक्त सातवी उत्तीर्ण... माहेर सोनगीर (ता. धुळे), तर सासर कासारे (ता. साक्री) येथील... सध्या त्या नाशिकला मोतीवाला कॉलेजजवळ वास्तव्यास आहेत. वडील संतोष मानाजी कुंभार हे पत्नी, चार मुली आणि दोन मुलांच्या परिवाराचे भरणपोषण करण्यासाठी परंपरागत मातीला आकार देण्याचा व्यवसाय अन्‌ जोडीला टेलरिंगचाही व्यवसाय करायचे. सुरेखाबाई घरात तिसऱ्या क्रमांकाची कन्या.

जगण्यासाठी नित्याचीच धडपड

रोजच्या जगण्याच्या रहाटात जीवनाचा गाडा हाकताना कुंभार कुटुंबाची दमछाक व्हायची. परिस्थिती जेमतेमच. कुटुंबाचा भार हलका व्हावा म्हणून मुलींची लग्ने लवकर केली. यामुळे अन्य बहिणींबरोबरच सुरेखाबाईंचेही शिक्षणाचे स्वप्न अपूर्णच राहिले. वयाच्या सतराव्या वर्षी, 1994 मध्ये त्यांचा विवाह झाला. पती शिवाजी पोपट ठाकरे पदवीधर असले, तरी सासरीही परिस्थिती बेताचीच. सासू-सासऱ्यांसह दहा जणांचे एकत्रित कुटुंब. तुटपुंजी जमीन, तीही कोरडवाहू. मजुरीशिवाय पर्याय नव्हता. रोज कमावले तरच, कुटुंबाला पोटभर मिळायचे.

आणि नाशिकचा रस्ता धरला

जगण्याची लढाई तीव्र असतानाच्या काळातच पती शिवाजी ठाकरे यांनी नाशिकचा रस्ता धरला. शिक्षण कमी असल्याने हंगामी नोकरीशिवाय पर्याय नव्हता. नाशिकमध्ये आनंदवली परिसरात दहा-बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत संसार थाटला. येथील महापालिका शाळेत वॉचमन म्हणून तात्पुरती नोकरी मिळाली... पगार होता दरमहा 600 रुपये. कुटुंबात पती-पत्नीशिवाय दीरही होते. तरीही न डगमगता सुरेखाताईंनी पतीला, जगण्याच्या लढाईवर मात करायचीच, हा आत्मविश्‍वास पदोपदी देत मोठा आधार दिला. 

मातीला अन्‌ कुटुंबालाही आकार 
माहेरी मिळालेले संस्कारांचे धडे आणि कष्टाची तयारी यातून, सुरेखाताई पारंपरिक कुंभार व्यवसायातील कला जोपासण्यासाठी सरसावल्या. त्यांच्या या कष्टाला पतीकडूनही प्रोत्साहन अन्‌ मदत मिळू लागली. त्यामुळे, मातीला आकार देतानाच कुटुंबालाही आधार मिळत होता. याच काळात सागर आणि आकाश या दोन्ही मुलांच्या निमित्ताने सुरेखाताईंच्या कुटुंबाचा विस्तार झाला. पणत्या, मातीचे बैल, गाडगी-मडकी बनविण्याबरोबरच सुरेखाताईंनी नाशिककरांसमोर गणपतीची विविध रूपेही सादर केली. 

स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण 
मातीकामाची हंगामी कला समोर आणतानाच सुरेखाताई येथील शाळेबाहेर गोळ्या, बिस्किटांचीही विक्री करू लागल्या. परिस्थिती पाठ सोडायला तयार नव्हती. तरीही परिस्थितीला झुकविण्यासाठी सुरेखाताईंचे कुटुंबीयांच्या मदतीने प्रयत्न सुरूच होते. याच काळात वडिलांनी दिलेले शिवणकामाचे बाळकडू त्यांनी पुढे आणले. पाइपलाइन रस्त्यावरील एका महिलेकडे शिवणकामाचे प्रशिक्षण घेत स्वतःच शिवणकाम करू लागल्या. याच कलेतून सुरेखाताईंनी कुटुंबाला सावरतानाच स्वतःलाही सिद्ध केले. पतीच्या तुटपुंज्या पगाराला मिळालेली सुरेखाताईंच्या कष्टाची जोड कुटुंबासाठी मोठा आधार बनली. एके काळी घरभाड्यासाठी पैसे नसलेल्या ठाकरे कुटुंबाने आज कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

महापालिका शाळा ते फिल्मसिटी 
परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सुटलेल्या ठाकरे दांपत्याने मुलांच्या निमित्ताने शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले. परिस्थितीमुळे त्यांच्या मुलांना महापालिका शाळेतून शिक्षणाचे धडे घ्यावे लागले. त्यातूनही स्वतःला सिद्ध करत संपूर्ण परिवाराने समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. दरम्यानच्या काळात पती शिवाजी ठाकरे हेही महापालिकेत वॉचमन म्हणून सेवेत कायम झाले. मोठा मुलगा सागर बीईचे शिक्षण पूर्ण करत फिल्मसिटीतील नामांकित अभिनेत्री सनी लिऑन हिच्या कंपनीत प्रोजेक्‍ट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर, दुसरा मुलगा आकाश हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा पूर्ण करून नाशिकमध्येच नोकरी करतोय. अनेकदा उपाशी राहण्याची वेळ येऊनही देवावर श्रद्धा असलेल्या सुरेखाताईंचे डोळे, दिवस नक्कीच बदलतात, हे सांगताना भरून आले. 

खचून जाऊ नका 
परिस्थिती कशीही असली, तरी ती कायम राहत नाही. स्वतःच्या कष्टातून, जिद्दीने नक्कीच परिस्थिती बदलता येते, असा ठाम विश्‍वास सुरेखाताई बाळगून आहेत. त्यामुळेच, महिलांनी कुठल्याही प्रसंगात खचून न जाता खंबीरपणे सामोरे गेल्यास संकटे परतवून लावता येतात, असे सांगतानाच महिलांनी खचून जाऊ नये, असा सल्लाही सुरेखाताई देतात. 

हेही वाचा-जळीत घटनांमधून दिव्यांगत्व,विद्रुपपणा आला,घाबरू नका

तनिष्कांना मोफत प्रशिक्षण देणार 
मातीकामातील कलाकुसरीतून रोजगाराच्या अनेक संधी असल्याचे सुरेखाताई सांगतात. तनिष्का व्यासपीठाच्या निमित्ताने महिलांना मिळालेल्या रोजगाराच्या संधी पुढे नेत असतानाच तनिष्कांना गणपती तयार करणे, पणत्या तयार करणे, डिझाइन करण्याबरोबरच गरजू, गरीब महिलांना शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही सुरेखाताई यांनी घेतली आहे. गणपती मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायात कमी भांडवलात मोठ्या प्रमाणात आर्थिक संधी असल्याने महिलांनी या व्यवसायाकडे संधी म्हणून पाहावे, असेही सुरेखाताई सुचवितात. 
संपर्क ः सुरेखा ठाकरे (मो. 9096784734) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com