पोषण आहार ठेकेदाराला बजावणार नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

जळगाव ः जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या तांदूळ व धान्यादी मालाचा अनियमित पुरवठा करण्यात आला आहे. यावल तालुक्‍यात हा प्रकार झाल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितल्यानंतर पोषण आहाराचा माल पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजाविण्यात येणार असल्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. 

जळगाव ः जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या तांदूळ व धान्यादी मालाचा अनियमित पुरवठा करण्यात आला आहे. यावल तालुक्‍यात हा प्रकार झाल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितल्यानंतर पोषण आहाराचा माल पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजाविण्यात येणार असल्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा आज सभापती पोपट भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला गजेंद्र सोनवणे, विजया पाटील, नंदा पाटील, रवींद्र पाटील, प्रल्हाद पाटील, रेखा राजपूत, हरीश पाटील आदी उपस्थित होते. सभेमध्ये पोषण आहाराचा मुद्दा उपस्थित झाला. यात यावलचे गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्‍यातील 70 ते 80 शाळांमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यातील तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा झाला नसल्याची तक्रार सभेत केली. यामुळे मालाचा अनियमित पुरवठा करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस बजाविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आल्याचे सभापती भोळे यांनी सांगितले. 

विनाअनुदानित शाळांचा अहवाल मागविला 
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विनाअनुदानित असलेल्या शाळांना वीस टक्‍के अनुदान देण्यासंदर्भातील निर्णय झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील काही शाळांना मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील मान्यता मिळालेल्या शाळांची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 

33 वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण 
जुन्या इमारती पाडून तेथे नवीन वर्गखोल्या बांधण्याची मान्यता देण्यात आली होती. जिल्ह्यात अशा 41 वर्ग खोल्या बांधण्यास शिक्षण समितीकडून मान्यता देण्यात आली होती. यातील 33 खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, पाच शाळांचे काम सध्या सुरू आहे. तसेच जागा किंवा अन्य कारणांमुळे तीन खोल्यांचे काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. त्याचप्रमाणे धोकादायक 24 वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यातील 17 पूर्ण झाले असून सहा शाळांचे काम सुरू आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jilha parishad poshan aahar notice