#BattleForDindori-महाले, पवारांनी तिकिटासाठी  पक्षनिष्ठा खुंटीला टांगली-  जिवा पांडू गावित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

 

 
निफाड ः माकप या एकाच पक्षात राहून वंचितांना न्याय मिळवून दिला. या माझ्या जनहितासाठी केलेल्या कामाचे ऑडिट मतदार निश्‍चितच करतील. जिल्ह्याच्या हक्‍क्‍याच्या 158 टीएमसी पाणी गुजरातला नेण्यास तीव्र विरोध केला. ही माझी कामाची पार्श्‍वभूमी आहे. केवळ निवडणुका नजरेसमोर ठेवून तिकिटाकरिता पक्षनिष्ठा खुंटीला टांगत भाजप, राष्ट्रवादीचे उमेदवार जनतेचे कसे प्रश्‍न सोडविणार, असा सवाल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील माकप उमेदवार कॉम्रेड जिवा पांडू गावित यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आदिवासींच्या वनहक्क अंमलबजावणीसाठी 1978 पासून लढा देत आहे. मुंबईत धडकलेला आदिवासी लॉंगमार्च, तसेच माझी आंदोलने ही सामान्य लोकांच्या हिताची असतात. त्यात मी कधीही राजकीय फायदा करीत नाही, असे सांगून आमदार गावित म्हणाले, की मी गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र पाणीसमस्या, तसेच नाशिक जिल्ह्यातील पाणीसमस्या यावर अभ्यास केला.

महाराष्ट्रात 28 नद्या रत्नागिरी ते सुरगाण्यापर्यंत पश्‍चिम वाहिनी आहेत. यांचे वाहून जाणारे 28 टीएमसी पाणी महाराष्ट्राचेच व नाशिक जिल्ह्याचे आहे. हे पाणी वळविल्यास गोदावरी व गिरणा खोरे सुजलाम होईल. नाशिक जिल्ह्यात येवले, चांदवड, मालेगाव, नांदगाव व सिन्नर हे पाच तालुका कायमस्वरूपी पाणीटंचाई मुक्त होतील. कारण माझ्या कामाच्या पद्धतीने हे शक्‍य आहे, असा दावा त्यांनी केला. 

गुजरातप्रमाणे28 टीएमसी पाणी सौराष्ट्रचा नेण्याचा डाव आहे. पश्‍चिम वाहिनी नद्यांच्या माध्यमातून वंचित येवले, नांदगाव व सिन्नर व चांदवड तालुका मी पाणीदार करणार आहे. माझी उमेदवारी केवळ आमदारांचे खासदार म्हणून प्रमोशन होण्यासाठी नाही. केवळ राजकीय हेतूने निधी दिला जात नसल्याने मांजरपाडा प्रकल्प 10.6 किलोमीटर इतका कॅचमेट एरिया असूनही हा प्रकल्प 66 कोटींवरून 323 कोटी खर्चाचा झाला, तरी पाणी नाही. केवळ धूळफेक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. 
इतर उमेदवार गाव सोडून शहरात राहतात. ते मतदारसंघातील प्रश्‍न काय सोडविणार? कांदा, द्राक्षे या पिकांच्या विक्रीव्यवस्थेवर मी काम करणार आहे. स्वामिनाथन शिफारस मोदी सरकारने लागू केली नाही. विजेचे भारनियमन सुरू आहे. निसाका- वसाका- गिसाका बंद पडले आहेत. उसउत्पादक हैराण आहेत. याकरिता मी खासदार म्हणून लोकसभेत जोरदार आवाज उठवेन. बहुजन समाजाने आमच्या कामाची पार्श्‍वभूमी पाहावी व कामाचे ऑडिट करावे, असेही आमदार गावित म्हणाले.  
-

Web Title: marathi news jp gavit