कालीदास कलामंदीराचे खासगीकरण,महापालिकेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेतर्फे नव्याने विकसित करण्यात आलेल्या कालिदास कलामंदीर व महात्मा फुले कलादालन खासगीकरणातून चालविले जाणार आहे. रामवाडी पुलाला समांतर तयार केल्या जाणाऱ्या हनुमान वाडी पुलाची उंची देखील वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेतर्फे नव्याने विकसित करण्यात आलेल्या कालिदास कलामंदीर व महात्मा फुले कलादालन खासगीकरणातून चालविले जाणार आहे. रामवाडी पुलाला समांतर तयार केल्या जाणाऱ्या हनुमान वाडी पुलाची उंची देखील वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या स्मार्ट रोडचे काम निर्धारीत कालावधीत पुर्ण होण्यासाठी बिटको व कन्या शाळेचे प्रवेश द्वार छत्रपती शिवाजी स्टेडीयमच्या बाजुने केला जाणार आहे. नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्या कामांचा आढावा आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला.

नाशिकचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या कालिदास कलामंदीर व महात्मा फुले कलादालनाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. कालिदास कलामंदीरचे किरकोळ काम वगळता 95 टक्के काम पुर्ण झाले असून येत्या आठवडाभरात महापालिकेकडे हस्तांतरीत केले जाणार आहे. यापुर्वी महापालिकेच्या यंत्रणेमार्फत कलामंदीरचे कामकाज होत होते. पण देखभाल व दुरुस्तीचा खर्च परवडण्यासाठी आता स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने खासगीकरणातून कलामंदीर चालविण्याचा पर्याय सुचविण्यात आला असून त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

शालीमार येथील नेहरु उद्यानात कारंजे व इलेक्‍ट्रिकल कामे वगळता योजना पुर्णत्वास येत असून पुढील आठवड्यात उद्यानाचे हस्तांतरण शक्‍य आहे. 
 
पुलाची उंची वाढविणार 
स्मार्ट सिटी अंतर्गत रामवाडी पुलाला समांतर हनुमानवाडी पुलाची निर्मिती केली जाणार आहे. सध्या पाणी व माती परिक्षण सुरु असून पुर पातळीपेक्षा पुल उंच ठेवण्यासाठी उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नव्याने प्रस्ताव तयार केला जाणार आहे. 
 
स्मार्ट रोड कामाला गती 
अशोक स्तंभ ते त्र्यंबक रोड दरम्यान स्मार्ट रोडची निर्मिती केली जाणार आहे. परंतू वाहतुक, दोन शाळा, जिल्हा न्यायालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय या रस्त्यावर असल्याने कामात अडथळे येत आहेत. निर्धारित वेळेत काम पुर्ण करण्यासाठी चार पाळ्यांमध्ये काम करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात एका बाजुचे काम हाती घेतले जाणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेवून सिबिएसच्या बाजुकडील कन्या व बिटको शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शिवाजी स्टेडीअमच्या बाजूने मार्ग काढला जाणार असून त्यासाठी शाळा व्यवस्थापनाशी चर्चा सुरु आहे. 

Web Title: marathi news kalidas kalamandir