संपतोय अधिक मास तरीही देवस्थानांचे दरवाजे बंद ! 

जगन्नाथ पाटील 
Saturday, 3 October 2020

अधिक मासमध्ये देवधर्म, पुजाविधी, विविध मंदिरांमध्ये होणारे धार्मिक महोत्सव आदींमुळे भाविकांची वर्दळ वाढती असते. मात्र सहा महिन्यांपासून धार्मिक पर्यटनात पुर्णतः मंदी आहे.

कापडणे : साधारणतः तीन वर्षांनंतर अधिक मास पडत असतो. या मासात धार्मिक कार्यक्रमांना अनन्य साधारण महत्व असते. मंदिरात विविध देवतांसह कुलदेवतांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते. यातून पर्यटनाला चालना मिळून मोठी आर्थिक उलाढालही होते. मात्र कोरोना लाॅक डाऊनमध्ये अद्यापही बर्‍याचशा गोष्टींवरील बंधने शिथील झालेली नाहीत. भाविकांना मंदिरापर्यंत पोहचण्यास अडचणी असल्याने दर्शनापासून दुरावले आहेत. अधिक मास अर्धा उलटल्या नंतरही मंदिरे ओस पडली आहेत. सहा महिन्यांपासून निरामय शांतता आहे.

दरम्यान नवरात्र उत्सवातील गरबा, दांडिया व मिरवणूकांना परवानगी नाकारल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मात्र जाणकारांमधून या निर्णयाचे स्वागतच होत आहे. 

 

जिल्ह्यातील कुलदेवतांची मंदिरे
जिल्ह्यात  एकविरा माता (धुळे), धनदाई माता म्हसदी, पेडकाई माता सावळदे, जोगाई माता कापडणे धनाई पुनाई माता (निजामपूरजवळ), बिजासनी माता, जोगेश्वरी माता (जोगशेलू), योगेश्वरी माता, संतोषी माता (धुळे), पाच पावली माता (कापडणे), भवानी माता (कुसूंबा), आशापुरी माता (पाटण), अन्नपुर्णा माता (कापडणे), बिजासनी माता (शिरपूर जवळ) भटाई माता (भदाणे), धनाई पुनाई माता,  म्हाळसा माता (अर्थे), इंदाशी माता (कुंडाणे), सती माता (बोरीस) आदी कुलदेवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांवर वर्षभर भाविकांची रीघ असते. अधिक मासमध्ये तर मोठी वर्दळ वाढते. भाविक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि लाॅक डाऊनची बंधने असल्याने मंदिरांकडे फिरकण्यास धजावत नसल्याचे पुढे आले आहे. सर्वच विश्वस्त संस्था नियमांचे बंधन पाळत आहेत.

पर्यटनासही मिळेल चालना
अधिक मासमध्ये देवधर्म, पुजाविधी, विविध मंदिरांमध्ये होणारे धार्मिक महोत्सव आदींमुळे भाविकांची वर्दळ वाढती असते. मात्र सहा महिन्यांपासून धार्मिक पर्यटनात पुर्णतः मंदी आहे. मंदिरे उघडण्यास पुर्ण परवानगी मिळावी. म्हणजे पर्यटनासही चालना मिळेल. बाजारात तेजी येईल, अशी अपेक्षा भाविक व व्यावसायिक व्यक्त करीत आहेत.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne Corona has affected industries in the area as temples are still closed.