‘टीईटी’चा निकाल लागला पण शिक्षक भरती करणार केव्हा ? 

जगन्नाथ पाटील   
Saturday, 8 August 2020

राज्य शासनाने महाभरतीचे महापोर्टल बंद केले आहे. त्यामुळे बेरोजगारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. पोलिसभरती करण्याचे घोषित केले, त्याप्रमाणे शिक्षकभरतीची घोषणा करावी.

कापडणे : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल तीन दिवसांपूर्वी घोषित झाला असून, त्यात साडेसोळा हजार भावी शिक्षक पात्र ठरले, तर अडीच लाख भावी गुरुजी नापास झाले. दुसरीकडे राज्यात सुमारे २० हजार शिक्षकपदे रिक्त आहेत. काही शाळांमध्ये एकाच शिक्षकाला चार वर्गांचा भार उचलावा लागत आहे. २०१० पासून शिक्षकभरतीला ब्रेक बसला आहे. बेरोजगार शिक्षकांना, नियमित शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही न्याय मिळेल, याबाबतीत शासनाची साशंक भूमिका आहे. त्यामुळे ‘टीईटी’तून महसूल गोळा करण्यापेक्षा पात्र शिक्षकांची थेट नियुक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा व खासगी अनुदानित शाळांमध्ये २०१८ पासून २० हजार ६६१ पदे रिक्त आहेत. सुमारे आठ हजार ५०० शिक्षक दोन ते चार वर्गांचे अध्यापन करीत आहेत. शंभरावर शाळांना अद्यापही पूर्णवेळ शिक्षक नाही. रिक्त पदांची संख्या वाढतच आहे. पदे रिक्त असल्यामुळे अधिकचे वर्ग सांभाळावे लागत असून, गुणवत्तेवर परिणाम होत आहे. पायाभूत चाचणींतर्गत त्याचे बारीकसारीक मूल्यमापन कसे करावे, हा शिक्षकांपुढचा प्रश्‍न कायम आहे. 

खानदेशातही पदे रिक्त 
जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमध्येही प्रत्येकी दोनशेपेक्षा अधिक शिक्षकपदे रिक्त आहेत. 

‘टीईटी’तून लाखोंचा महसूल संकलित 
२०१० पासून शिक्षकभरती झालेली नाही. टीईटी परीक्षा नियमित घेतली जात आहे. परीक्षा शुल्काच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी कोटीवर महसूल गोळा केला जात आहे. पण, बेरोजगार शिक्षकांची भरती करण्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष होत आहे. यातून बेरोजगारांची कुचंबणा होत आहे. 

 
‘टीईटी’त साडेपंधरा हजार गुरुजी पात्र 
पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जानेवारी २०२० मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. तीन लाख ४३ हजारांपैकी १६ हजार ५९२ शिक्षक या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नोकरी मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत. ‘टीईटी’च्या पेपर एकसाठी (पहिली ते पाचवी गट) एक लाख ८८ हजार ६८८ पैकी १० हजार ४८७ पात्र झाले. पेपर दोनसाठी (सहावी ते आठवी गट) एक लाख ५४ हजार ५९६ परीक्षार्थींपैकी सहा हजार १०५ पात्र झाले. आतापर्यंतच्या सहा परीक्षांमध्ये राज्यभरातील ८६ हजार २९८ शिक्षक या परीक्षेत पात्र ठरले आहेत. दरम्यान, राज्य शासनाने महाभरतीचे महापोर्टल बंद केले आहे. त्यामुळे बेरोजगारांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. पोलिसभरती करण्याचे घोषित केले, त्याप्रमाणे शिक्षकभरतीची घोषणा करावी. राज्यातील गुणवत्ता टिकविण्यासाठी दमदार पाऊल टाकण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

असे आहेत वर्षनिहाय पात्र शिक्षक 

वर्ष पात्र शिक्षक 
२०१३ : ३१,०७२ 
२०१४ : ९,५९५ 
२०१५ : ८,९८९ 
२०१७ : १०,३७३ 
२०१८ : ९,६७७ 
२०२० : १६,५८२ 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kapadne TET results announced but when teachers recruit process