हवाई सर्वेक्षणाचा अहवाल मोदींकडे जाणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जळगाव ः महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला लाभदायी ठरू शकणाऱ्या तापी नदीवर प्रस्तावित मेगा रिचार्ज (महाकाय जलपुनर्भरण) योजनेंतर्गत तापी नदीच्या खोऱ्यातील जमिनीचे हवाई सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

जळगाव ः महाराष्ट्र व मध्य प्रदेशाला लाभदायी ठरू शकणाऱ्या तापी नदीवर प्रस्तावित मेगा रिचार्ज (महाकाय जलपुनर्भरण) योजनेंतर्गत तापी नदीच्या खोऱ्यातील जमिनीचे हवाई सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी सहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 

या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये घेण्यात आला आहे. भाजपचे तत्कालीन यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिभाऊ जावळे (भाजप) यांनी 1999 मध्ये या प्रकल्पाचा मुद्दा विधानसभेत मांडला होता. तत्कालीन केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी खारियागोटी (मध्य प्रदेश) येथे जाऊन प्रकल्पासंबंधीची माहिती घेतली होती. गुजरातमध्ये नर्मदा नदीवर सरदार सरोवर साकारून आशिया खंडातील मोठा प्रकल्प, असा गाजावाजा भाजपच्या मंडळीने नंतर केला. या प्रकल्पाचा प्रचारात चांगला उपयोग झाला. तसाच उपयोग तापी नदीवरील महाकाय प्रकल्पासंबंधी करून घेण्याचा प्रयत्न भाजप करणार असल्याचे सांगितले जाते. 

रावेर, यावल चोपड्याला लाभ 
मेगा रिचार्ज (महाकाय जलपुनर्भरण) योजनेंतर्गत महाराष्ट्रातील रावेर, यावल, चोपडा व विदर्भातील काही तालुक्‍यांना लाभ होईल, तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूरला फायदा होईल, असा दावा आहे. केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भागासाठी हा प्रकल्प असणार आहे. त्यात खरियागोटी (मध्य प्रदेश) येथे मोठ्या क्षमतेचा बंधारा असेल. हा भाग बऱ्हाणपूरपासून नजीक आहे. हा बंधारा उंच भागात असल्याने पाणी नैसर्गिकरीत्या वेगाने खालच्या भागात येईल. 

वीज निमिर्तीचा प्रयत्न 
वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. दोन कालवे असतील. एक कालवा रावेर, यावल व चोपडापर्यंत (अनेर नदीनजीक) असेल. सातपुडा पर्वतालगत बझाडा क्षेत्र (भूगर्भातील नैसर्गिक पोकळ्या) आहे. त्यात पाणी जिरून जलस्तर वाढविण्याचा प्रयत्न आहे. कालव्यातून पाणी सातपुडामधून वाहणाऱ्या नद्यांमध्ये सोडले जाईल. पुराचे पाणी कालव्यामार्गे वळवून महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सातपुड्याच्या पायथ्याशी आणले जाईल. उजव्या कालव्याच्या माध्यमातून बऱ्हाणपूर, नेपानगर, धारणी, रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर भागातील जमिनीला लाभ होईल. डाव्या कालव्याद्वारे विदर्भात अकोला जिल्ह्यातील अकोट, अचलपूर, अंजनगाव सुरजी, बुलडाण्यातील जळगाव- जामोद व इतर भागास लाभ होईल. 
 
"लायडर' तंत्रज्ञानाचा वापर सर्वेक्षणासाठी 
जवळपास पावणेचार लाख हेक्‍टर जमिनीची भूजल पातळी वाढण्यास मदत होईल. गोयंको इंडिया प्रा. लिमिटेड (हैदराबाद) या कंपनीने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी सर्वांत प्रगत "लायडर' या तंत्रज्ञानाचा वापर सुरू आहे. यावल तालुक्‍यातील फैजपूर, चोपडा, बऱ्हाणपूर, शहापूर, नेपानगर या ठिकाणी हेलिपॅड तयार केले आहेत. 10 दिवसात सर्वेक्षण करायचे आहे. येत्या चार महिन्यांत प्रकल्पाला अंतिम मंजुरी आणि निधी उपलब्ध होऊ शकतो. हा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: marathi news khjandesh jalgaon havai survey ahaval modi