डोकावून पाहिले तर...अडकलेली बादली बिबट्याने धरली ! 

विनोद शिंदे  
Tuesday, 26 May 2020

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा आणून त्यात कुत्र्याचे पिलू ठेवले, पिंजरा क्रेनच्या सहाय्याने विहिरीत सोडला. बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला बाहेर काढले.

कुसूंबा ः शेतातील विहिरीतुन पाणी काढण्यासाठी बादली टाकली... मात्र, ती अडकली...बादली कुठे अडकली हे पाहण्यासाठी विहिरीत डोकावले तर ती बादली चक्क बिबट्याच्या ताब्यात...तेंव्हा समजले की विहिरीत बिबट्या पडला आहे. ही माहिती शेतकऱ्याने वनविभागाला कळविली आणि मग सुरु झाली बिबट्याला बाहेर काढण्याची कसरत. अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि मग त्याला बाहेर काढले. आनंदखेडा (ता. धुळे) येथील ही घटना. 

कुसुंब्याजवळील आनंदखेडा येथे काशिनाथ राजाराम पाटील यांच्या शेतातील तीस फुट विहीरीत 25 मेस तीन वर्षाचा बिबटया विहिरीत पडला. श्री. पाटील सकाळी शेतात गेले. पाणी काढण्यासाठी त्यांनी विहिरीत बादली टाकली पण ती कुठेतरी अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. विहिरीत डोकावून पाहिले तर बादली बिबट्याने घटट्‌ पकडून ठेवल्याचे त्यांना दिसले. जोरात झटका देऊन त्यांनी बादली वर काढली आणि माजी सरपंच देवेंद्र पाटील यांना फोनवरून त्यांनी बिबटया विहिरीत पडल्याची माहिती दिली. देवेंद्र पाटील यांनी त्वरीत वनविभाला ही माहिती कळविली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा आणून त्यात कुत्र्याचे पिलू ठेवले, पिंजरा क्रेनच्या सहाय्याने विहिरीत सोडला. बिबट्या पिंजऱ्यात शिरला आणि त्याला बाहेर काढले. वैद्यकीय तपासणी करुन बिबट्याला लळींग कुरणात सोडण्यात आले. उपवनसंरक्षक डी. बी. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस. व्ही. पाटील, वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर शरमाळे, वनपाल नितीन सांगळे, डी. बी. पाटील, वनरक्षक निखिल कोळी यांनी हे रेस्क्‍यु ऑपरेशन राबविले. विहिरीत पडलेला बिबट्या कुत्र्याच्या पिलाची शिकार करतांना विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kusmba-dhule leopard fell into the well