नाशिकः येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यांस ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत संशयिताने 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये पोलिस उपअधीक्षक, उपनिरीक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. याचठिकाणी महिला पोलिस अधिकारीही प्रशिक्षण घेत असताना त्यांना गेल्या 13 तारखेला संशयित अनंतकुमार गुप्ता (रा. चांदणी चौक, मायापूर, अंबिकीपूर, छत्तीसगड) याने मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी संशयिताने महिला पोलिस अधिकाऱ्यास आपणास ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे सांगितले. या आमिषाला भुरळून गेलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्याचा संशयिताने वारंवार फोन करून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने ही रक्कम मिळविण्यासाठी जीएसटी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही रकमेची मागणी केली. त्यानुसार महिला पोलिसाने विश्वासाने संशयिताने सांगितलेल्या बॅंक खात्यावर 61 हजार रुपये जमा केले. मात्र तरीही संशयिताकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याने महिला पोलिसाला शंका आल्याने त्यांनी गंगापूर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे तपास करीत आहेत.