सीईओंच्या खुर्चीला संतप्त सदस्यांनी घातला हार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

जळगाव : जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने त्याचे पडसाद आता जाणवू लागले आहेत. सलग तीन बैठकांना उपस्थित राहत नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्‍त केला. 

जळगाव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीची सभा आज अध्यक्षा उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेतील सानेगुरूजी सभागृहात सदर सभा होती. जिल्हा परिषद प्रशासनातील प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे उपस्थित राहणे अपेक्षित असल्याचे सदस्यांची मागणी गेल्या काही सभांपासून सुरू आहे. मात्र, सीईओ दिवेगावकर हे दर महिन्याला होणाऱ्या स्थायी, जलव्यवस्थापन समितीच्या सभेला उपस्थित राहत नसल्यावरून सदस्यांमध्ये नाराजी होती.

तसेच जलव्यवस्थापन समितीच्या सलग दोन बैठकांना सीईओ दिवेगावकर उपस्थित नसताना, आजच्या सभेलाही सीईओ दिवेगावकर उपस्थित नव्हते. प्रशासनातील प्रतिनिधी म्हणून अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर उपस्थित होते. मात्र, सीईओंची उपस्थिती असावी, अशी मागणी करताना संतप्त सदस्य पवन सोनवणे आणि रोहन पाटील यांनी सभागृहातील सीईओंच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्‍त केला. यानंतर सभेचे कोणतेही कामकाज न करता सभा तहकूब करण्यात आली. 

Web Title: marathi news local jalgaon news CEO chair