खडकी फाट्यावर बिबट्याचे दर्शन 

दीपक कच्छवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

मेहुनबारे (ता. चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे महामार्गावरील खडकीसीम फाट्यावर आज सकाळी अकराच्या सुमारास गुरांसाठी टाकलेल्या चाऱ्यात शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. वन विभागाला कळविल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत बिबट्या तेथून पसार झाला होता. 

मेहुनबारे (ता. चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे महामार्गावरील खडकीसीम फाट्यावर आज सकाळी अकराच्या सुमारास गुरांसाठी टाकलेल्या चाऱ्यात शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. वन विभागाला कळविल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत बिबट्या तेथून पसार झाला होता. 

वरखेडे (ता. चाळीसगाव) भागातील नरभक्षक बिबट्या ठार झाल्यानंतर आज सकाळी अकराच्या सुमारास खडकी येथील रहिवासी सुधीर भाईदास पाटील यांना बिबट्या दिसला. त्यांचे शेत गावापासून दोन किलोमीटर अंतरावर चाळीसगाव-धुळे महामार्गालगत आहे. शेतात गुरांसाठी चारा म्हणून खोंडे टाकलेले होते. सुधीर पाटील यांना चाऱ्याजवळ बिबट्या जाताना दिसताच ते घाबरले. या दरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या कळमडू येथील दोघांनीही बिबट्याला पाहिले. ही घटना खडकी गावात कळताच घटनास्थळी संपूर्ण गाव जमा झाले. 

शेताला ग्रामस्थांचा घेराव शेतातील चाऱ्यात बिबट्या दडून बसलेला असावा, म्हणून ग्रामस्थांसह रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. मेहुणबारे पोलिसांनाही पाचारण करावे लागले. ग्रामस्थांची गर्दी वाढतच गेल्याने पोलिस उपनिरीक्षक नाजीम शेख यांनी ग्रामस्थांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. मात्र, कोणीही तेथून जात नसल्याने गर्दी वाढतच गेली. बिबट्या दिसल्याने घटनास्थळी थांबून असलेले जिल्हा परिषद सदस्या मोहिनी गायकवाड यांचे पती अनिल गायकवाड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांना कळविले. त्यांनी वनपाल प्रकाश देवरे, प्रकाश पाटील, प्रवीण गवारे, बापू शितोळे यांना घटनास्थळी पाठवले. 'या भागात ग्रामस्थांना बिबट्या दिसला असेल तर सावधानता बाळगावी. बिबट्या असलेल्या शेतात ग्रामस्थांनी घेराव करु नये. असे केल्यास, बिबट्या हल्ला करण्याची शक्‍यता असते. शेतात जाताना व कामे करताना शेतकऱ्यांनी सतर्क राहावे,' असे घोडेगाव विभागाचे वनपाल प्रकाश देवरे यांनी सूचित केले. संपूर्ण शेताला जणू ग्रामस्थांनी घेराव घातलेला होता. मात्र, शेतातील चारा व उभ्या पिकांचा फायदा घेऊन बिबट्या केव्हाच पसार झाला होता. शेतात रौंदळ केल्यामुळे बिबट्याच्या पायांचे ठसे मिळून आले नाही. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह काही ग्रामस्थांनी संपूर्ण परिसरात बिबट्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची पुन्हा भीती पसरली आहे. 

 

Web Title: marathi news lopard found forest department