प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही मतदारसंघांत युतीच्या नेत्यांची फौज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही मतदारसंघांत युतीच्या नेत्यांची फौज 

प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात दोन्ही मतदारसंघांत युतीच्या नेत्यांची फौज 

नाशिक, ः नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवला, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलण्यात आल्याने भाजपमध्ये नाराजी असल्याने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजप-शिवसेना महायुतीच्या नेत्यांची मोठी फौज दोन्ही मतदारसंघांत प्रचारासाठी दाखल होणार आहे. 22 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे सभा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा 24 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर घेण्याचे नियोजन सुरू आहे. पिंपळगाव येथील सभेसाठी जागेची चाचपणी केली जात असून, सुरक्षा यंत्रणेकडून जागेची पाहणी होत आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची लढत कॉंग्रेस महाआघाडीचे समीर भुजबळ यांच्याशी होणार आहे. पण माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने युतीच्या मतांची विभागणी होण्याची भीती व्यक्त होत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांना उमेदवारी नाकारून त्याऐवजी राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा पक्षात प्रवेश करून त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात भाजपमध्ये नाराजी आहे.

महायुतीत चैतन्य आणण्यासाठी मोठ्या नेत्यांच्या सभा घ्याव्यात, असा सूर कार्यकर्त्यांचा असल्याने तसे सभांचे नियोजन सुरू आहे. महायुतीच्या नाशिक व दिंडोरीतील दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. 2014 च्या निवडणुकीत पिंपळगाव बसवंत येथे मोदींची सभा घेण्यात आली होती. त्याच मैदानावर 22 एप्रिलला सभा घेतली जाणार आहे. शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम, भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्याकडे सभेच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

गोल्फ क्‍लब मैदानावर 
मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंची सभा 

श्री. मोदी यांची सभा झाल्यानंतर 24 एप्रिलला भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा गोल्फ क्‍लब मैदानावर होणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू झाले आहे. 

राज यांच्या सभेचे नियोजन 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक लढवत नसली, तरी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांच्याविरोधात प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मतदारांचे लक्ष ते वेधून घेत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर 25 एप्रिलला गोल्फ क्‍लब मैदानावर श्री. ठाकरे यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे. 
 

Web Title: marathi news mahayuti sabha