तीच्या डोळस कष्टाने बहरले शिवार

माणिक देसाई
गुरुवार, 8 मार्च 2018

निफाडः विवाहबंधनात अडकल्यावर अवघ्या पाचच वर्षांत पतीची दृष्टी हळूहळू विझत जाताना पाहणे नशिबी आले. मात्र, त्या डोळ्यांतील स्वप्नांना आपले डोळे देऊन घराच्या शेतीचे "जू' आपल्या खांद्यावर घेऊन, प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर स्वार होऊन तिनं शेतीत नंदनवन फुलवलं... "शेतीचा शोध स्त्रीने लावला' या स्त्रीच्या महतीला तितकाच न्याय देणाऱ्या अंध पतीच्या हातातील काठी बनलेल्या कारसूळ (ता. निफाड) येथील सबला महिला शेतकरी कल्पना शंकपाळ म्हणजे महिलांच्या सबलतेचं मूर्तिमंत उदाहरणच! 

द्राक्षपंढरी म्हणून बिरुद मिरवणारा निफाड तालुका त्यातही कर्जबाजारी, निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्‍याला आत्महत्यांचे ग्रहण लागलेले. त्याच लहरीपणाला आव्हान देऊन कल्पना शंकपाळ यांनी धाडसाने द्राक्षशेतीतून कुटुंबाला एकाहाती उभे केले. महिलेने द्राक्षाची शेती करणे याबरोबरीनेच अशक्‍य ते शक्‍य करण्याची धमक स्त्रियांच्या नाजूक समजल्या गेलेल्या मनगटांत असते, हा संदेशही दिला. आज जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्या परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या महिलांसाठी रोल मॉडेल ठरतात. 

कारसूळ येथील पदवीधर तरुण वसंत शंकपाळ व कल्पना यांचा विवाह झाला. सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतानाच अनाहूत पतीच्या नजरेला ग्रहण लागले. तिच्या जगात कायमस्वरूपी अंधार झाला. त्यातच स्वतःला सावरून अंध पती व मुलासाठी कल्पनाने "आता कधीच मोडून पडायचे नाही' हा ठाम निर्धार केला. शेतीचा कुठलाही अनुभव गाठीशी नसताना आपल्या साडेचार एकर शेतीत पतीच्या शेतीच्या ज्ञानाला आपले तन-मन-धन व दृष्टिकोनाची जोड देऊन शेतीला सुरवात केली. वसंत यांचे मार्गदर्शन व आसपासच्या शेतीचे निरीक्षम करून आपल्या रया गेलेल्या शेताचा पट नव्याने रेखायला सुरवात केली. आपले शेतशिवार रात्रंदिवसाच्या जितोड मेहनतीने सावरायला सुरवात केली. ढेकळांना पाझर फोडला. या कृषकलक्ष्मीने आपलं शिवार हिरवेगार करण्यासाठी ढेकळांना पाझर फोडण्याची किमया साध्य केली. बॅंक आँफ बडोदाकडून कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करून आजमितीस स्वतःच्या लाखो रुपयांचे हक्काचे घर, स्वतःच्या मालकीचा ट्रॅक्‍टर आणि द्राक्षाने समृद्ध शेती उभी केली. 
कुणाचाही अधार नसताना यशस्वी शेती करणाऱ्या कल्पना यांनी, "शेती परवडत नाही' म्हणणाऱ्या व कर्जमाफीवर आपल्या शेतीतीचे आस्त्वि तोलणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले. 

कष्ट आणि जिद्दीचे एक तप! 
त्यांनी शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आता एक तप लोटलं आहे. आज त्या स्वतः शेतीतील बारे देणे, ट्रॅक्‍टर चालवून नांगरट, कोळपणी करण्यापासून फवारणीपर्यंतची सर्व कामे करतात. ओखी वादळाने द्राक्षशेतीची धूळदाण करायला घेतल्यावरही तब्बल नव्वद क्विंटल द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. 

Web Title: marathi news mahila din