महिला सजग राहिल्यास गुन्हेगारीस बसेल आळा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

नाशिक : सोनसाखळीचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असले. महिलांनी सावधगिरी बाळगल्यास असे प्रकार आपोआप कमी होतील. गुन्हेगारी वेगाने वाढते आहे. प्रत्येक कुटुंबात महिलांची भूमिका महत्त्वाची असते. परिपक्‍वतेअभावी आजची मुले-मुली सोशल मीडिया, स्मार्टफोनचा वापर करताना भरकटून जातात. ही समस्या नेमकेपणाने समजून घेताना महिलांनी स्वत:सह संपूर्ण कुटुंबाला गुन्हेगारांपासून वाचविण्यासह मुले गुन्हेगारीकडे वळणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस उपायुक्‍त माधुरी कांगणे यांनी गुरुवारी (ता. 8) येथे केले.

नाशिक : सोनसाखळीचोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत असले. महिलांनी सावधगिरी बाळगल्यास असे प्रकार आपोआप कमी होतील. गुन्हेगारी वेगाने वाढते आहे. प्रत्येक कुटुंबात महिलांची भूमिका महत्त्वाची असते. परिपक्‍वतेअभावी आजची मुले-मुली सोशल मीडिया, स्मार्टफोनचा वापर करताना भरकटून जातात. ही समस्या नेमकेपणाने समजून घेताना महिलांनी स्वत:सह संपूर्ण कुटुंबाला गुन्हेगारांपासून वाचविण्यासह मुले गुन्हेगारीकडे वळणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस उपायुक्‍त माधुरी कांगणे यांनी गुरुवारी (ता. 8) येथे केले.

जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई-आग्रा महामार्गावरील क्‍युरी मानवता कॅन्सर सेंटर संस्थेतर्फे "सकाळ-तनिष्का' व्यासपीठातर्फे सामाजिक काम उभारणाऱ्या व्यक्‍ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्या बोलत होत्या. "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, क्‍युरी मानवता कॅन्सर सेंटरचे प्रमुख व कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर उपस्थित होते.

श्रीमती कांगणे म्हणाल्या, की समस्या छोट्या असताना, त्यावर तोडगा काढल्यास जास्त परिश्रम घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे कुटुंबात वावरताना महिलांनी सजग राहून कुठलीही समस्या छोटी असताना संबंधित समस्येचे निराकरण करणे आवश्‍यक आहे. 
श्रीमंत माने म्हणाले, की "सकाळ-तनिष्का' स्थापनेमागचे मूळ महिला सुरक्षा हेच होते. भावनिक सुरक्षा, शारीरिक व आर्थिक सुरक्षा या व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक महिलांना उपलब्ध करून दिली. आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्‍नदेखील गंभीर बनला आहे. पुरुषसत्ताक पद्धतीत प्रथांनी दिलेले समज दूर करत, परंपरा तोडत महिलांनी कुटुंबातील अन्य सदस्यांप्रमाणे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. 

निरोगी महिला खऱ्या अर्थाने सक्षम : डॉ. नगरकर 
स्त्री हा प्रत्येक घरातील आधारस्तंभ असतो. पण स्वत:च्या दुर्लक्षामुळे आरोग्य धोक्‍यात घालत असते. निरोगी महिला खऱ्या अर्थाने समक्ष महिला होऊ शकतात, असे मत कर्करोगतज्ज्ञ डॉ. राज नगरकर यांनी व्यक्‍त केले. ते म्हणाले, की कर्करोग आजाराबद्दलच्या गैरसमजामुळे अनेक महिला रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. त्यामुळे अनेक महिलांमध्ये कर्करोगाचे निदान होण्यास विलंब होऊन त्यांना जीव गमवावा लागतो. आजारात खचून न जाता, आपल्याला झालेल्या आजाराचा स्वीकार करत एखाद्या सहजीप्रमाणे उपचाराचा काळ अनुभवायला हवा. दहा वर्षांत 41 हजार रुग्णांवर रुग्णालयात उपचार झाल्याचे सांगताना जीवनदायी योजनेंतर्गत तब्बल 29 हजार गरजू रुग्णांना उपचार उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. नगरकर यांनी आनंद व्यक्‍त केला. 

"तिला' मिळाले अनोखे गिफ्ट 
मजुरी करून प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलाला शिकविण्यासाठी येवला तालुक्‍यातील जळगाव नेऊर येथील लता कदम यांच्यासाठी यंदाचा महिला दिन वेगळे गिफ्ट देऊन गेला. जागतिक महिलादिनीच त्यांच्या मुलाला सैन्यात नोकरी लागल्याने कार्यक्रमस्थळी श्रीमती कदम यांना अश्रू अनावर झाले. उपस्थित तनिष्का भगिनींनी त्यांचे अभिनंदन केले. 

महिलारत्न गौरव पुरस्कारार्थींची नावे अशी ः 
क्‍युरी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे वैयक्‍तिक व सांघिक सत्कार करण्यात आले. यात मालेगावच्या नीलिमा पाटील, पिंपळगाव बसवंतच्या संगीता घेगडे, मानूर (ता. कळवण)च्या लता पवार, नाशिकच्या प्राप्ती माने, डॉ. साधना पवार, अर्चना मारगॉनवार, लखमापूरच्या ज्योती देशमुख, चंदनपुरी येथील राणी गायकवाड, प्रतिभा पवार यांच्यासह राणेनगर तनिष्का गट, तनिष्का शिक्षक फोरम, गोविंदनगर तनिष्का गट, पाथर्डी फाटा तनिष्का गट, तनिष्का डॉक्‍टर्स फोरम, वडनेरभैरव तनिष्का गट, स्वामी विवेकानंदनगर तनिष्का गट, जेल रोड तनिष्का गट, चेतनानगर तनिष्का गट, मालेगावमधील तनिष्का शिक्षक फोरम, नेऊरगाव तनिष्का गट, राजीवनगर युनिक तनिष्का गट, इगतपुरीचे तनिष्का शिक्षक फोरम यांचा सत्कार करण्यात आला. 

Web Title: marathi news mahila din progm