अयोध्याच्या निकालानंतर मालेगावात शांतता; व्यवहार सुरळीत

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

मालेगाव : अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी, बाबरी मश्‍जिद जमीन वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना रामलल्ला पक्षकाराचा दावा मान्य केला. यामुळे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र पुर्व-पश्‍चिम भागात शांतता असून सर्व व्यवहार व जनजीवन सुरळीत आहे. 
   

मालेगाव : अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी, बाबरी मश्‍जिद जमीन वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना रामलल्ला पक्षकाराचा दावा मान्य केला. यामुळे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाबद्दल शहरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र पुर्व-पश्‍चिम भागात शांतता असून सर्व व्यवहार व जनजीवन सुरळीत आहे. 
   

नवीन बसस्थानकाजवळील खास भरणाऱ्या भंगार बाजारातही ग्रामीण भागातील अनेक नागरिकांची वर्दळ होती. बाजार पेठांमधील कामकाज सुरळीत होते. मुस्लीमबांधव रविवारच्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुक व सणाच्या तयारीत व्यस्त होते. जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह शहरात दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासह वरीष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून विविध पोलिस ठाण्यांचे निरीक्षक शहर व परिसरात गस्त घालत आहेत. पोलिस बंदोबस्तात यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे. 
शिवसेना, भाजप, बजरंग दल यासह हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी कुठलाही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला असून शहरातील शांतता व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याचे आवाहन केले आहे. 
   एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, जनता दलाचे सरचिटणीस मुश्‍तकीम डिग्निटी आदींनी हा निर्णय प्रथमदर्शनी आस्थेला आधार मानून देण्यात आला. आम्ही या निर्णयावर नाराज आहोत. मात्र शहर शांततेला सर्वोच्च प्राधान्य असेल असे सांगितले. मौलाना मुफ्ती यांनी जमियत ए उलेमाचे आदेश आल्यानंतर या संदर्भात पुढील दिशा ठरविण्यात येईल असे सांगितले. ग्रामीण भागातही शांततेने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आज सायंकाळी जिल्हा पोलिस प्रमुख आरती सिंह यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक होणार आहे. नवीन व जुन्या बसस्थानकावरही नेहमीप्रमाणे वर्दळ होती. शहरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा दिपावलीच्या सुटीनंतर सुरु झाल्या आहेत. खबरदारी म्हणून काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही. यामुळे मुलांच्या उपस्थितीवर झालेला परिणाम वगळता दुपारपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news malegaon