कामांच्या तपासणीनंतरच बिल, मालेगाव महापालिकेचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये अकरा विकासकामे झालेली नसताना त्यांची बिले काढण्यात आली. या प्रकारानंतर आयुक्त संगीता धायगुडे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात महापालिका फंडातून झालेल्या एक हजार 566 विविध विकासकामांची तपासणी केल्यानंतरच 35 कोटींची बिले अदा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमध्ये अकरा विकासकामे झालेली नसताना त्यांची बिले काढण्यात आली. या प्रकारानंतर आयुक्त संगीता धायगुडे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षभरात महापालिका फंडातून झालेल्या एक हजार 566 विविध विकासकामांची तपासणी केल्यानंतरच 35 कोटींची बिले अदा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

शहरवासीयांच्या कराची उधळपट्टी थांबवावी, आर्थिक शिस्त लागावी, कराचा पैसा योग्य रीतीने खर्च व्हावा या हेतूने तपासणीच्या माध्यमातून सोशल ऑडिट करण्यात येणार आहे. श्रीमती धायगुडे यांनी दीड हजार कामांची यादी केली असून, तपासणीसाठी समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपअभियंता, महापालिका अभियंता, कर्मचारी, पत्रकार व समाजसेवक यांचा समावेश आहे.

या पद्धतीच्या पाचपेक्षा अधिक तपासणी समितीचे पथक करून सर्व कामांची तपासणी करण्यात येईल. कामे झाल्याची खात्री झाल्यानंतरच बिले अदा करण्यात येतील. यामुळे महापालिकेच्या कामकाजालाही आर्थिक शिस्त लागण्यास मदत होईल. जनतेच्या पैशांचा अपव्यय थांबेल. महापौर रशीद शेख यांचा चौकशी समिती व कामांची तपासणी करण्याच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. 

14 कामे बोगस 
गेल्या महिन्यात श्रीमती धायगुडे यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष प्रभागात जाऊन पाहणी केली. त्या वेळी अकरा कामांची बोगस बिले आढळली. एका कामाचे तर ठिकाणच आढळले नाही. ज्या ठेकेदाराच्या नावाने ही बिले काढण्यात आली. त्याने 14 कामे बोगस झाली असून, आपणाला या संदर्भात कुठलीही माहिती नाही. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या गैरव्यवहारप्रकरणी दोन कनिष्ठ अभियंत्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. 
 
देयकांची स्थिती 
विकासकामांचे वर्ष - 2017-18 
एकूण कामांची संख्या - 1 हजार 566 
एकूण देणी - 45 कोटी 
शासकीय देणी - 10 कोटी 
बांधकाम व महापालिका फंडाशी संबंधित बिले- 35 कोटी 

Web Title: marathi news malegaon mahapalika decesion