व्यवस्थापिकानेच घातला मोबाईल कंपनीला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नाशिक : महापालिकेसमोरील व्होडाफोन स्टोअरच्या व्यवस्थापिकेनेच कंपनीला तब्बल साडेआठ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. डॉली विजय चंद्रात्रे (28, रा. बिल्डिंग-3, शुभम्‌ पार्क, उत्तमनगर, सिडको) असे संशयित व्यवस्थापिकेचे नाव असून तिच्याविरोधात सरकारवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
व्होडाफोन कंपनीतर्फे प्रशांत लखीचंद हिंदुजा (रा. दी कॅपिटल, कुलकर्णी गार्डनशेजारी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सिबीएस-शरणपूर रोडवरील महापालिकेच्या राजीव गांधी भवनाजवळ व्होडाफोन या मोबाईल कंपनीचे व्होडाफोन स्टोअर आहे. या स्टोअरची व्यवस्थापिका म्हणून संशयित डॉली विजय चंद्रात्रे ही काम पाहात होती. संशयित डॉली हिने 19 ते 26 एप्रिल 2018 दरम्यान स्टोअरमध्ये कार्यरत असताना आपल्या पदाचा दुरुपयोग केला. व्होडाफोन कंपनीच्या एमपीइएसए या पोर्टलवरून संशयित डॉली हिने 8 लाख 94 हजार 834 रुपयांचा आर्थिक व्यवहार केला होता.

संशयिताने 26 एप्रिल रोजी त्यापैकी फक्त 50 हजार रुपयेच कंपनीच्या खात्यावर जमा केले. तर उर्वरित 8 लाख 37 हजार 34 रुपयांचा अपहार करून कंपनीची आर्थिक फसवणूक केली. कंपनीच्या आर्थिक ताळमेळीमध्ये गोंधळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने तपास केला असता, संशयित डॉली हिनेच अपहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, तिच्याविरोधात सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
Web Title: MARATHI NEWS MANAGER FRAUD