जळगाव महापालिकेत जंतूनाशक फवारणीचा 22 लाखाचा साठा पडून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

जळगाव महापालिकेची अवस्था कर्जामुळे बिकट आहे. निधीसाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात येत असतांना दुसरीकडे आरोग्यविभागाकडे साहित्य येवूनही त्यांचा वापर होंत नसल्याचे दिसून आले आहे.

जळगाव : "आंधळ दळतय अन कुत्रपीठ खातंय'अशी स्थिती जळगाव महापालिकेची झाली आहे. महापालिकेवर हुडको व जिल्हा बॅंकेचे कर्ज असल्यामुळे निधीसाठी सफाईची कामे रखडली आहेत.प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर सकाळी पदयात्रा करून स्वच्छतेची पाहणी करीत आहे, अशा स्थिती आरोग्यविभागाचा आणखी एक गलथानपणा उघडकीस आला आहे, शहरात जंतूनाशकाची फवारणी करण्यासाठी आलेला 22 लाख रूपयाचा साठा न वापरता तसाच पडून आहे.

स्थायी समिती सभापती वर्षा खडके व भाजप नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी गोडावूनची पाहणी केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. प्रभारी आयुक्ताबरोबर आता पदाधिकारीही कामाला लागले आहे. "सकाळ'ने दिलेल्या वृत्ताचा परिणाम दिसून आला आहे. 

जळगाव महापालिकेची अवस्था कर्जामुळे बिकट आहे. निधीसाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात येत असतांना दुसरीकडे आरोग्यविभागाकडे साहित्य येवूनही त्यांचा वापर होंत नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे बालगंधर्व खुले नाट्यगृहात गोडावून आहे, त्या िंठकाणी आरोग्य विभागाचे साहित्य आहे. त्याची पाहणी आज स्थायी समिती सभापती वर्षा खडके व भाजप नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी अचानकपणे केली. त्यावेळी या ठिकाणी शहरात जंतू नाशक फवारणीचा तब्बल 1800 लीटर साठा आढळून आला.

विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासूुन तो आला आहे.पाच महिन्यात केवळ पाच लिटरच जंतूनाशक वापरण्यात आले आहे. शहरातील कोणत्याच प्रभागात त्याचा वापर झालेला नाही. जळगाव शहरात घाणीचे साम्राज्य आहे, नागरिकांच्या वेळोवेळी तक्रारी येत असतांना लाखो लिटरचा हा साठा वापराविनाच पडून असल्याचे आढळून आले आहे. स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांनी आरोग्यधिकारी डॉ.विकास पाटील यांना विचारणा केली असता, त्यानीं सांगितले कि, आपण आरोग्यनिरिक्षकांना जतूनाशक फवारणी करण्यासाठी घेवून जाण्यास सांगितले परंतु त्यांनी तो नेलेला नाही. केमिकल सोबतच जळगाव महापालिकेने व्यापारी संकुलात ठेवण्यासाठी मागविलेल्या कचरा कुंडयाही पडलेल्या या िंठकाणी आढळून आल्या आहेत.निष्काळजीपणा बद्दल संबधित अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस स्थायी समिती वर्षा खडके यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

'सकाळ' बातमीचा परिणाम 
'सकाळ'ने आज सिहांसन सदरात "राजे'नी दल हलविले पदाधिकारी केंव्हा हलणार या मथळ्याखाली वृत्त दिले होते. त्याचा परिणाम दिसून आला. स्थायी समिती सभापती वर्षा खडके यांनी स्वत: पुढाकार घेवून आज गोडावूनची पाहणी केली.त्यांनी ताबडतोब आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील यांच्याकडून माहितीही घेतली आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनीही तपासणीत सहकार्य केले आहे. त्यामुळे आता पदाधिकारी व नगरसेवकही हलू लागल्याचे दिसून येत आहे.

Web Title: marathi news marathi website Jalgaon Municipal Corporation