चाळीसगाव-मालेगाव राज्यमार्गाला खड्डेच खड्डे

शिवनंदन बाविस्कर
शुक्रवार, 28 जुलै 2017

चाळीसगाव-मालेगाव (राज्यमार्ग क्र. 19) या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ‘हायब्रिड ऍन्युइटी मॉडेल’ च्या धर्तीवर राज्यात ‘हायब्रिड ऍन्युइटी’ योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानुसार मालेगाव बांधकाम विभागाने ‘ऍन्युइटी’ योजनेचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली. त्या योजनेनुसार बांधकाम विभागाने रस्त्याचे तातडीने सर्व्हेक्षण देखील पुर्ण केले. मात्र राष्ट्रीय महामार्ग मंजुर झालेल्या रस्त्यांना या योजनेंतर्गत काम करता येत नसल्याने मंजुर झालेली ‘ऍन्युइटी’ योजना अखेर रद्द झाली आहे.

पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : चाळीसगाव-मालेगाव या राज्यमार्ग क्र. 19 ची वर्षभरापासून दयनीय अवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. डोळेझाक केलेल्या बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

चाळीसगाव-मालेगाव हा रस्ता एकूण 49 किलोमीटरचा आहे. मालेगावकडून चाळीसगावकडे येतांना सुरुवातीचा 12 किमीचा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र, उर्वरित रस्त्याची सद्यःस्थितीत अक्षरशः चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालवतांना रस्त्यावर मोठी कसरत करावी लागते आहे. काही ठिकाणी रस्त्यावरचा डांबर पुर्णपणे निघाला आहे. सध्या वाहनांची वर्दळ वाढली असल्याने छोट्यामोठ्या अपघातांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यात पावसाळा सुरु झाल्याने रस्ता आणखीनच खरब झाला आहे. रस्ता दुरुस्ती संदर्भात ‘दै. सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित करुन बांधकाम विभागाला जाणीव करुन दिली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग मंजुर
चाळीसगाव-मालेगाव (राज्यमार्ग क्र. 19) या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या ‘हायब्रिड ऍन्युइटी मॉडेल’ च्या धर्तीवर राज्यात ‘हायब्रिड ऍन्युइटी’ योजना कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानुसार मालेगाव बांधकाम विभागाने ‘ऍन्युइटी’ योजनेचा प्रस्ताव हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी पाठविला होता. त्याला मंजुरीही मिळाली. त्या योजनेनुसार बांधकाम विभागाने रस्त्याचे तातडीने सर्व्हेक्षण देखील पुर्ण केले. मात्र राष्ट्रीय महामार्ग मंजुर झालेल्या रस्त्यांना या योजनेंतर्गत काम करता येत नसल्याने मंजुर झालेली ‘ऍन्युइटी’ योजना अखेर रद्द झाली आहे.

शिवाय या रस्त्यावर आता कुठलेही मोठे काम बांधकाम विभागाला करता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता ताब्यात घेईल तेव्हा घेईल, परंतू याची तात्पुरती डागडुजी तरी सद्यःस्थितीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.

रस्त्याला लावलेले 'ठिगळ' निघाले
मालेगाव व नांदगाव तालुक्याला जोडणारा हा रस्ता आहे. गत नोव्हेंबर महिन्यात रस्त्याची मालेगाव बांधकाम विभागातर्फे तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र हि डागडुजी वाहनधारकांसाठी फार काही काळापुरता दिलासा देणारी ठरली नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजु अत्यंत खराब झाल्या आहेत. रस्त्याचे जे भाग खुप खराब आहेत. त्यापैकी बर्याच ठिकाणी डागडुजी झाली नव्हती. त्यामुळे ते भाग सद्यःस्थितीत अधिक खराब झाले आहेत. तर काहि ठिकाणी डागडुजीचे ठिगळ निघाले आहेत.

Web Title: marathi news marathi website nashik malegaon chalisgaon road